- सोमनाथ खताळ
बीड : बीड तालुक्यातील कपीलधार वाडी येथे तीन दिवसाचे जिवंत बाळ (मुलगी) सोमवारी सकाळी सापडले आहे. दुर्दैव म्हणजे या मातेने त्या बाळाला काटाळ बाभळीच्या झाडाच्या आळ्यात टाकून दिले. ग्रामस्थांनी त्याला तात्काळ बीडला आणले. सध्या या बाळावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. जन्म देणाऱ्या मातेने असे राक्षसी कृत्य केल्याने संताप व्यक्त होत आहे.
बीड शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर कपीलधार वाडी गाव आहे. याच गावापासून २०० मिटर अंतरावर एका काटाळ बाभळीच्या झाडाच्या आळ्यात एक बाळ सकाळी शौचास गेलेल्या नागरिकांना दिसले. त्यांनी तात्काळ ही माहिती पालीचे पोलीस पाटील वैजिनाथ नवले यांना दिली. त्यांनी धाव घेतली. तोपर्यंत ग्रामस्थांनी त्या बाळाला आळ्यातून बाहेर काढले. महिलांनी त्याला आधार दिला आणि तात्काळ जिल्हा रूग्णालयात आणले. येथे अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते सत्वशील कांबळे हे सध्या बाळाची काळजी घेत आहेत.
रडून रडून बेशुद्धहे बाळ रात्रीच्या सुमारासच काटेरी आळ्यात टाकले असावे. त्यामुळे ते रडून रडून शांत झाले होते. सकाळी सापडले तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. तसेच त्याची नाळ काटेरी झुडपाला अडकलेली होती. त्यामुळे त्याला मोठा त्रास झाला असावा, असे तज्ज्ञांनी सांगितले.
महिलांनी दिली मायेची उबबाळ सापडल्याचे बातमी गावभर पसरली. परिसरातील महिलांनी तात्काळ धाव घेतली. काही महिलांनी ओल्या कपड्याने त्याचे अंग पुसले तर एका महिलेने त्याला दुध पाजले. त्यामुळे त्याने डोळे उघडले. त्यानंतर अवघ्या काही क्षणात त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
महिला पोलीस नाहीघटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस हवालदार जयसिंग वाघ यांनी रूग्णालयात धाव घेतली. मात्र वरिष्ठ अधिकारी दुपारी ११.३० पर्यंत रूग्णालयात आले नव्हते. एवढे गंभीर प्रकरण असतानाही वरिष्ठांचे दुर्लक्ष होणे संतापजनक आहे. तसेच या ठिकाणी एकही महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हत्या. बीड ग्रामीण पोलिसांची हा हलगर्जीपणा संतापजनक आहे. पोह वाघ हे रूग्णालयात उपस्थित होते.