बीड : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आता प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. यापुढे ५ ते ७ मे पर्यंत तीन दिवस कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे, तर ८ व ९ मे रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक वस्तू खरेदी करता येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
बुधवार, गुरुवार व शुक्रवार हे तीन दिवस दिवसभर मेडिकल, पेट्रोल पंप, आरोग्यविषयक दुकाने सुरू राहणार आहेत. तसेच बॅंका सकाळी १० ते १२ या काळात सुरू होणार आहे. दूध विक्री सकाळी ७ ते ११ व गॅस वितरण दिवसभर करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
दरम्यान, शनिवार व रविवार दोन दिवस सकाळी ७ ते ११ या कालवधीत भाजीपाला, फळे, किराणा, बेकरी व कृषी संदर्भातील जीवनावश्यक वस्तू नागरिकांना खरेदी करता येणार आहेत. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत रस्त्यावर फिरून फळे-भाजी विक्री करता येणार आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढत आहे. प्रशासनाच्या आवाहनानंतर देखील विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे मोबाईल अँटिजेन टेस्ट बीडसह इतर शहरात सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.