बीड : स्वातंत्र्य सैनिक असल्याचे भासवून खोटे प्रमाणपत्र काढत नौकरी बळकावणाऱ्या आरोग्य विभागातील वर्ग ३ च्या तीन कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. लातूरचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी हे आदेश नुकतेच काढल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी वर्ग ४ च्या १७ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली होती.
सतीश नारायण भांडवलकर (रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी), राजरत्न श्रीमंतराव जायभाये (औषधनिर्माता) व अनिल शिवाजी नवले (भांडार तथा वस्त्रपाल) अशी बडतर्फ झालेल्या वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी जिल्हा रूग्णालयात कार्यरत होते. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसताना खोटी कागदपत्रांच्या आधारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून त्या आधारे जिल्ह्यातील शेकडो जणांनी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवल्याचे प्रकरण सन २००३ मध्ये समोर आले होते. शिवाय, स्वातंत्र्यसैनिक पाल्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घेत १०६ जणांनी जिल्ह्यात नोकऱ्याही मिळवल्या होत्या, मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर न्यायालय व शासनाच्या आदेशानंतर आता या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास सुरुवात झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा रुग्णालयातील वर्ग चारच्या आस्थापनेवरील १७ कर्मचाऱ्यांना डॉ. अशोक थोरात यांनी बडतर्फ केले होते. तर वर्ग ३ च्या पाच कर्मचाऱ्यांवर आरोग्य उपसंचालक कारवाई करणार होते.
दरम्यान, राहिलेल्या पाच पैकी दोन कर्मचारी हे उस्मानाबाद व लातूर येथे कार्यरत असून तीन कर्मचाऱ्यांवर उपसंचालकांनी बडतर्फची कारवाई केली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर मात्र अद्यापही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी या कर्मचाऱ्यांवर झाली होती कारवाई भानुदास एकनाथ उगले (कक्षसेवक), बबन रघुनाथ वनवे (सफाईगार), सुखदेव बाबासाहेब वनवे (सफाईगार), महारुद्र लाला किर्दांत (पहारेकरी), भागवत लोभा वडमारे (कक्षसेवक), द्वारका सुभाष नागरगोजे (प्रयोगशाळा स्वच्छक), परमेश्वर भानुदास जगताप (कक्षसेवक), तुकाराम सूर्यभान जगताप (कक्षसेवक), संगीता विठ्ठल मुळे (बाह्यरुग्ण सेवक), महारुद्र बाबासाहेब वनवे (प्रयोगशाळा परिचर), तात्यासाहेब लक्ष्मण सांबरे (कक्षसेवक), अशोक नानाभाऊ आडसूळ (कक्षसेवक), प्रकाश रघुनाथ बडगे (शिपाई), सुंदरराव दत्तात्रय बडगे (कक्षसेवक), युवराज रघुनाथ शिंदे (कक्षसेवक), प्रल्हाद भीमराव गर्कळ (कक्षसेवक), हनुमंत ज्ञानोबा तुपे (कक्षसेवक) या सर्व १७ कर्मचाऱ्यांवर (वर्ग ४) बडतर्फची कारवाई झाली होती. आता वर्ग ३ च्या सतीश नारायण भांडवलकर (रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी), राजरत्न श्रीमंतराव जायभाये (औषधनिर्माता) व अनिल शिवाजी नवले (भांडार तथा वस्त्रपाल) या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.