- फकिरा देशमुख
भोकरदन : राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी आमदार अमरसिंह पंडित या दोन्ही नेत्यांनी 1 मे रोजी भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानी तब्बल तीन तास गुप्त चर्चा केली. या भेटीचे कारण कापूस व तुर, हरबरा खरेदी सेंटर सुरू करण्याचे सांगितले जात असले तरी या गोपनीय बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे कळायला मार्ग नाही. मात्र राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे व अमरसिह पंडित भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसरात चांगलेच रमल्याचे दिसत होते.
राष्ट्रवादीचे नेते असलेले धनंजय मुंडे व माजी आमदार अमरसिंह पंडित हे दोन्ही नेते दुपारी 12 वाजता रावसाहेब दानवे यांच्या भोकरदनच्या निवास्थानी आले. त्यापूर्वी दानवे यांचे चिरंजीव आमदार तथा भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संतोष दानवे हे जालना येथून धनंजय मुंडे यांच्या गाडीत आले व गाड्या सरळ बंगल्यात दाखल झाल्या. त्यानंतर तब्बल 3.30 वाजेपर्यंत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री धनंजय मुंडे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यात गुप्त चर्चा झाली. या बैठकीत काय गुप्त खलबत्ते झाले, हे कळाले नाही. मात्र मुंडे यांचे दानवे यांच्याशी काहीतरी खाजगी काम होते. ते करून घेण्यासाठी मुंडे भोकरदनला आले असे समजते. या बैठकीनंतर आमदार संतोष दानवे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी पाहुणचार सुद्धा केला होता. यावेळी दानवे यांच्या संपूर्ण बंगल्याच्या परिसरात फेरफटका मारून परिसराची पाहणी केली. एकेकाळी भाजपामध्ये असलेले हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेते माहेरी आल्यासारखेच या बंगल्याच्या परिसरात रमले होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याकडे कापूस, तुर, व हरबरा पडून आहे. शिवाय सीसीआय दररोज 20 वाहने व एका शेतकऱ्यांचा 40 क्विंटल कापूस खरेदी करीत आहे. तो वाढवावा व खरेदी केंद्र अधिक प्रमाणात सुरू करावी. काही केंद्र खरेदी केंद्रावर कापूस खरेदीसाठी केंद्रप्रमुख नाही ते देण्यात यावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना भेटण्यासाठी मी आणि माजी अमरसिह पंडित आलो होतो. याभेटीत काही राजकीय बाब नव्हती असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. याचबरोबर, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि माजी आमदार अमरसिंह पंडित हे दोघे माझाकडे आले होते. मात्र त्यांची ही सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी येण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना फोन करून आपण भोकरदनला येत असल्याचा निरोप दिला होता, असे समजते. मात्र धंनजय मुंडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.