कडा : कांद्या बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे घोडेगाव येथील पांढरी पुलावरून अपहरण करणाऱ्या तिघांना मंगळवारी सकाळी नगर पोलिसांनी कडा पोलिसांच्या मदतीने कडा येथील एका हाॅटेलमध्ये ओलिस ठेवलेल्या व्यापाऱ्याची सुटका करून तिघांना अटक केली.
आष्टी तालुक्यातील महेश होळकर, रवि बायकर, तर नगर येथील अमोल शेळके यांनी गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथील कांदा बियाणे विक्री व्यापारी भगवान धनसिंग सिहरे (४८) याला आर्थिक देवाण घेवाणीवरून बियाणे हवे आहे म्हणून पांढरी पूलावर बोलावले. भाड्याने वाहन घेऊन व्यापारी सिहरे येताच बळजबरीने ओढाताण करून ताब्यात घेत सोमवारी दुपारी पांढरी पुलावरून कडा येथील एका हाॅटेल मध्ये आणले. त्यानंतर व्यापाऱ्याच्या नातेवाईकांना सुरवातीला पाच तर नंतर आठ लाख रूपयाची मागणी करून ओलीस ठेवले.
याप्रकरणी व्यापाऱ्याचा भाऊ अंगद धनसिंग सिहरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाणे अहमदनगर येथे सोमवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेथील पोलिसांनी चोवीस तासांत आष्टी पोलिसांच्या मदतीने या प्रकरणी छडा लावत आरोपी महेश होळकर रा. कुंभारवाडी ता.आष्टी, रवि बायकर रा. पुंडी ता.आष्टी, व अमोल शेळके रा. ब्राह्मणी नगर या तिघांना ताब्यात घेउन अटक केली. ही कारवाई अहमदनगर व आष्टी पोलिसांनी केली.