लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी/माजलगाव : जिल्ह्यात मागील २४ तासात तीन अपघातात तीन जण ठार झाले. आष्टी तालुक्यातील डोईठाण रस्त्यावर दोन अपघातात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. तर कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर दुचाकीने धडक दिल्याने एक युवक ठार झाला.माजलगाव : रस्त्यावर जीपचे पंक्चर काढणाऱ्या चालकाला सहकार्य करण्यासाठी उतरलेल्या युवकाला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील जायकोवाडी शिवारात माऊली फाटा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.किशोर शंकर कंकरे (२८, रा. भडंगवाडी ता. गेवराई) नामक युवक मंगळवारी सकाळी गावाकडून आपले पाण्याचे टँकर आणण्यासाठी माजलगाव तालुक्यातील तालखेडकडे प्रवासी वाहतूक करणा-या जीपमधून (क्र. एम. एच. ४४ जी २५७९) निघाला होता.दरम्यान कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर माऊली फाट्याजवळ जीप अचानक पंक्चर झाली. त्यावेळी जीपचालकाला काढण्यासाठी मदत करण्यास किशोर जीपमधून उतरला व पंक्चर काढू लागला. त्याचवेळी गेवराईकडून भरधाव येणा-या दुचाकीने (क्र. एमएच. २१/बीओ०९१३) किशोरला जोराची धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तो जागीच ठार झाला. या अपघातात दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला.आष्टी-डोईठाण रस्त्यावर दोन जण ठारआष्टी तालुक्यातील डोईठाण रस्त्यावरील किन्ही गावच्या हद्दीत कार उलटल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला. याच रस्त्यावर अन्य एका अपघातात एक जण ठार झाला. राखीव पोलीस दलामध्ये सेवेत असलेले अंबादास आश्रुबा जेधे (जाटनांदूर ता. शिरुर कासार) व बालाजी ज्ञानोबा चाटे (साकूड ता. अंबाजोगाई) हे दोघे डोईठाण रस्त्यावरील किन्ही गावच्या हद्दीत सावरगाव येथून लग्न उरकून कारने ( क्र. एम.एच १४ एफ एम ९१३२) गावाकडे जात होते.दरम्यान चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली. यात बालाजी चाटे वय (३५) हे जागीच ठार झाले. तर अंबादास जेधे हे गंभीर जखमी झाले आहेत. दुसºया घटनेत याच रस्त्यावरील चिंचाळाफाटा परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गणेश सर्जेराव लोहार (रा.जामखेड) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पो.ना. कैलास गुजर हे करत आहेत.
माजलगाव, आष्टीत तीन अपघातांत तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:11 AM