बीड : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना संशयित असलेल्या ३ लाख ७२ हजार ७७७ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पैकी ३ लाख २४ हजार ३९९ लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर ४८ हजार ३७८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आठ लाख लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
बीड : कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जातो. आतापर्यंत जिल्ह्यात ४८ हजार ३७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कातील ८ लाख ६९ हजार ७१८ लोकांचा शोध घेण्यात आला आहे. याचा टक्का १७.९७ एवढा असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
शासकीय सीसीसीमध्ये २४१४ खाटा रिक्त
बीड : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खाटा अपुऱ्या असल्याची ओरड होत आहे. परंतु जिल्ह्यात ३९ शासकीय कोविड सेंटरमध्ये ४ हजार ८१६ खाटांची क्षमता आहे. पैकी २४१४ खाटा सोमवारी रिक्त होत्या. तसेच खासगी तीन कोविड सेंटरमध्ये ३१० खाटा रिक्त होत्या. जिल्ह्यात ४२ कोविड सेंटर आहेत. यामध्ये २५६८ रुग्ण सोमवारी उपचार घेत होते.
जिल्ह्याचा मृत्युदर १.७६ टक्के
बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबत नसल्याचे चित्र सोमवारीही दिसून आले. जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ८ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या आयसीएमआर पोर्टलवर झाली होती. आतापर्यंत जिल्ह्यात ८५२ लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. याचा टक्का १.७६ एवढा आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी ही माहिती दिली.
आष्टी सीसीसीमधून १८ कोरोनामुक्त
बीड : आष्टी येथील कोविड केअर सेंटरमधून सोमवारी १८ कोरोनाबाधित रुग्णांना सुटी देण्यात आली. पुढील सात दिवस होम क्वारंटाइन राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. या सीसीसीमध्ये ४०० खाटांची क्षमता असून, २९६ खाटा सोमवारी रिक्त होत्या. १०४ रुग्ण येथे उपचार घेत होते. मागील काही दिवसांपासून या सीसीसीमधून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यात १२६ कोविड सेंटरमध्ये उपचार
बीड : जिल्ह्यात जसजशी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तसतशी कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १२६ कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या सेंटरमध्ये ४ हजार ३६४ खाटा सोमवारी रिक्त होत्या. ५ हजार ६८६ रुग्ण जिल्हाभरात उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्हा रुग्णालयात लिक्विड टँकर दाखल
बीड : जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. प्रशासनाकडून तो भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारे लिक्विड कमी पडत असतानाच सोमवारी प्रशासनाने एक टँकर जिल्हा रुग्णालयात आणले. यामुळे आता किमान पुढील दोन दिवस जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, अशी शक्यता वर्तविली जाते आहे.