बीड : आयकर अधिकाऱ्यांच्या लॉगईन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून तब्बल साडे तीन लाख रूपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सय्यद साजेद सय्यद महेबूब (रा. राजूनगर, धानोरा रोड, बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. साजेद हा २००८ पासून कंत्राटी कर्मचारी आयकर कार्यालयात कार्यरत होता. त्याच्याकडे डाटा एंट्रीचे काम सोपविण्यात आले होते. कार्यालयीन कामाचा भाग म्हणून आयकर अधिकाऱ्यांचा लॉगईन आयडी व पासवर्ड त्याच्याकडे होता. त्या आधारे त्याने २०१५ ते २०१८ या दरम्यान करदात्यांचा आयकर परतावा तसेच टीडीएसचा अधिकचा क्लेम देऊन त्याद्वारे मिळणारा रिफंड मंजूर करुन घेत तो एका पतसंस्थेतील खात्यात जमा करुन उचलला. अशा प्रकारे त्याने प्रथमदर्शनी ३ लाख ५७ हजार १० रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.
१८ डिसेंबर २०१८ रोजी नंदकिशोर झरीकर (रा. क्रांतीनगर) या करदात्याने त्यांच्या नावे परस्पर ई- फाईल बनवून कर परताव्याचे ८४ हजार ४१० रुपये उचलल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आयकर अधिकारी धीरेंद्र रंगदळ यांनी पडताळणी केली तेव्हा गोवर्धन गिते ९७ हजार ४९०, विजूबाई मोराळे ९३ हजार ३२० व प्रभाकर उंबरे यांच्या नावे ८१ हजार ७९० रुपये कर परतावा परस्पर उचलल्याची बाब समोर आली. त्यानंतर रंगदळ यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन फसवणूक व आयकर कायदा कलम १४३ (१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास सहायक निरीक्षक महेश टाक करत आहेत.