अंबाजोगाई : अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात कोविडबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरू केलेल्या डीसीसीएचमध्ये सध्या पाच वाॅर्ड सुरू आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने येणाऱ्या रुग्णांना ठेवायचे कोठे? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर निर्माण
होत आहे. यावर प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून आणखी तीन नवीन वॉर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
अंबाजोगाई तालुक्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या रुग्णांवर प्रभावी उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने मेडिसिन विभागाच्या तळमजल्यातील तिन्ही वॉर्ड कोविडसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
कोविडच्या वाढत्या रुग्णांना योग्य उपचार मिळावेत म्हणून प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्याबाहेरील कोविड रुग्णसुद्धा स्वारातीत उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या वाढत जाणाऱ्या रुग्णांना बेड उपलब्ध कसे करता येतील, याचा विचार करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार अधिष्ठाता कार्यालयात
विधान परिषदेचे आ. संजय दौंड, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अपर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार बिपीन पाटील, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, डॉ. प्रशांत देशपांडे, उप अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे, उप अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ. पवार, डॉ. नितीन चाटे, डॉ. अंकुशे, डॉ. वाघमारे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक खंडू गोरे, डॉ. सचिन काळे रणजित लोमटे विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत तब्बल तीन तास बैठक झाली.
या बैठकीत वाढत्या कोविड रुग्णांची संख्या तसेच त्यांना उपचार मिळण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करून मेडिसिन विभागाची तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर प्रत्येक बेडला ऑक्सिजन कनेक्ट असलेले असलेले तिन्ही वाॅर्ड कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरक्षित करण्यात आले.
बैठकीनंतर या तिन्ही वॉर्डांची पाहणी करण्यात आली व बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून आवश्यक ती दुरुस्ती करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये हे तिन्ही वाॅर्डात कोरोनाबाधित रुग्णांसाठी सेवा सुरू करण्यात येणार आहेत.