बीड : हेल्थ क्लबची फीस मागितल्याच्या कारणावरून शहरातील शहबाज खान याचा खून केल्याप्रकरणी आरोपी कालू उर्फ अरबाज राजू उर्फ फेरोज खान, समद खान युसूफ खान व राजू उर्फ फेरोज खान युसुफ खान (सर्व रा. बुंदेलपुरा, बीड) यांना दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा येथील जिल्हा व अति. सत्र न्या.२, सी. एम. बागल यांनी मंगळवारी सुनावली.
१७ मे २०१७ रोजी सायंकाळी शहरातील कारंजा भागात कटकटपुरा येथील अत्तरच्या दुकानासमोर दलमिर खान यांचा मुलगा शहबाज खान यांस कालू ऊर्फ अरबाज राजू खान याने चाकूसारख्या धारदार शस्त्रानेे छातीवर वार करून जखमी केले व इतर लोकांनी लाथाबुक्याने मारहाण केली व पळून गेले. जखमी शहबाजला सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. शहबाज खान हा शहरातील बालेपीर भागात डी. के. हेल्थ क्लब चालवत होता. आरोपींकडे त्याने हेल्थ क्लबची फीस मागितल्यावरून त्यांच्यात वाद होता. याप्रकरणी दस्तगीर खान हमीद खान यांनी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सात आरोपींविरुद्ध खून करणे व इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी बीड शहर ठाण्याचे तात्कालीन सहा. पोलीस निरीक्षक एस. एस. जाधव यांनी सखोल तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण हे सत्र न्यायालयात सुनावणीसाठी वर्ग करण्यात आले. जिल्हा व अति. सत्र न्या.२, सी. एम. बागल यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता ॲड. अजय दि. राख यांनी काम पाहिले. त्यांना मूळ फिर्यादीतर्फे ॲड. राजेश देशपांडे यांनी मदत केली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पो.हे.कॉ उबाळे यांनी मदत केली.
१२ साक्षीदार तपासले
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पूरावा, वैद्यकीय पुरावा व इतर साक्षीदारांचे जबाबाचे अवलोकन करून व जिल्हा सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी १) कालू उर्फ अरबाज राजू उर्फ फेरोज खान २) समद खान युसूफ खान ३) राजू उर्फ फेरोज खान युसुफ यांना भादवि कलम ३०२, ३४ प्रमाणे दोेषी धरून जन्मठेप व प्रत्येकी रुपये तीन हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दहा दिवसांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
पुरावा नष्ट केल्याप्रकरणी शिक्षा
तपासा दरम्यान गुन्ह्याच्या कामी वापरलेला चाकू पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नालीत फेकण्यात आल्याचे निष्पण झाल्यावरून भादंविचे २०१ हे कलम वाढविण्यात आले होते. या प्रकरणात आरोपी क्र. १ कालू उर्फ अरबाज राजू उर्फ फेरोज खान यास पुरावा नष्ट केल्याबद्दल भादवी कलम २०१प्रमाणे तीन वर्षांची शिक्षा व दंड रुपये पाचशे व दंड न भरल्यास पाच दिवसांची सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली.