परळी (बीड): काही प्रमाणात ओला कोळशाचा पुरवठा होत असताना देखील येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच सुरळीत चालू असून शुक्रवारी या तीन संचातून एकूण 580 मेगावॅट विजेचे उत्पादन चालू होते.
परळी तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात 250 मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक 6, 7 व 8 हे तीन संच असून या तीन संचाची एकूण स्थापित क्षमता 750 मेगावॅट आहे. सध्या काही प्रमाणांत ओला कोळशाचा पुरवठा होत असताना देखील तिन ही संच सुरू आहेत. पावसाळ्यात परळीचे तिन ही संच चालू असल्याने वीज निर्मिती सातत्याने होत आहे. शुक्रवारी दुपारी तीन संचातून 580 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती चालू आहे. ओल्या कोळशाचा पुरवठा बंद होऊन चांगला कोळसा आल्यास वीज निर्मितीत वाढ होईल.
आंध्र प्रदेशातील एससीसीएलकडून रेल्वेने नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रास कोळशाचा पुरवठा होतो. यात काही प्रमाणात ओला कोळसा येत गेल्याने वीज निर्मितीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. दरम्यान, 675 मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती नेण्याची तयारी नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड व इतर अधिकारी कर्मचारी हे वीज संच सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.