बीड : आई-वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन मुलांचे आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले. मात्र पुढे चालून तीन मित्र एकत्र आले. केवळ पार्टी करण्यासाठी पैसा नसल्याने ते गुन्हेगारीकडे वळले. आज ते तीन मित्र अट्टल दुचाकीचोर बनले. या मित्रांच्या बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने सोमवारी दुपारी जामखेडमध्ये पाठलाग करून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सात दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
गणेश तुकाराम मुरूमकर (२१), वैभव भागवत सानप (२० रा.साकत ता.जामखेड जि.अ.नगर) व अजय अशोक माने (२३ रा.तपनेश्वर गल्ली, जामखेड) अशी पकडलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तिघांची घरची परिस्थिती हालाकिची आहे. अशा परिस्थितीतही आई-वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी अहमदनगरला टाकले. तिघांनीही आयटीआयला प्रवेश घेतला. येथे त्यांची घट्ट मैत्री झाली. एखाद्या कंपनीत नौकरी करून आई-वडिलांचे नाव कमावण्यापेक्षा त्यांना मौज मस्ती करण्याची सवय झाली. पार्टी, फिरायला जाण्याची आवड झाली. मात्र नंतर काही दिवसांनी यासाठी पैसा कमी पडू लागला. म्हणून गणेशने दुचाकी चोरीचा फंडा वैभव व अशोक समोर मांडला. त्यांनीही याला होकार देत त्याला साथ दिली. त्यांनी बीडसह अ.नगर जिल्ह्यातून अनेक दुचाकींची चोरी केली आहे.
हे तिघेही सोमवारी जामखेड येथे असल्याची माहिती सपोनि गजानन जाधव यांना मिळाली. त्यांनी पथकासह सापळा लावला. पोलिसांना पाहून ते तिघे दुचाकीवरून पळून जात होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यांना पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गजानन जाधव, मुंजाबा सौंदरमल, संजय खताळ, राजेभाऊ नागरगोजे, बबन राठोड, अशोक दुबाले, राहुल शिंदे, भारत बंड, सुबराव जोगदंड, महेश चव्हाण, दिलीप गित्ते, महेश भागवत, अंकुश दुधाळ, नारायण साबळे आदींनी केली.