बीड : आष्टी तालुक्यातील चिखली येथे घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नितीन शांतीलाल चखाले यास ३ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी सुनावली.चिखली येथील आजी- आजोबाकडे अल्पवयीन मुलगी आजारी असल्याने पुणे येथून आली होती. सदर मुलीचे आई- वडील हे मयत आहेत. २० जानेवारी २०१८ रोजी आजी- आजोबा शेतात गेल्याने ही मुलगी सकाळपासून घरात एकटीच होती. दुपारी ती घराच्या दारात बसलेली असताना गावातीलच नितीन चखाले याने घरात कोण आहेत याची विचारणा केली. त्यानंतर शाम्पू आणण्यासाठी २० रुपये देऊ लागला तेव्हा तिने नकार देत तिच्याकडे पैसे असल्याचे सांगितले. हे पैसे कुठे आहेत, दाखव म्हणत तिच्या घरात घुसला आणि विनयभंग करत बळजबरीचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलगी ओरडल्याने नितीन पळून गेला. हा प्रकार तिने सायंकाळी घरी परतलेल्या आजी- आजोबांना सांगितला. गावात आरोपीचे नातेवाईक जास्त असल्याने पीडितेचे कुटुंब घाबरलेले होते. नंतर २६ जानेवारी रोजी मुलीच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ूझाला. पोलीस नाईक केदार यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.या प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. यातील पीडित मुलगी, तिची आजी तसेच राणी रणसिंग, तपासी अंमलदार केदार, आळजापूर जि. प. शाळेचे मुख्याध्यापक व इतर कागदोपत्री पुरावा आणि सहायक सरकारी अभियोक्ता राम बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी नितीन चखाले यास कलम ३५४ अ, ४५२ भादंवि आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ८ प्रमाणे प्रत्येकी ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. प्राची कुलकर्णी यांनी सुनावली.या प्रकरणात अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी वकील राम बिरंगळ यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार इंगळे, पोलीस हे. कॉ. पालवे यांनी सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तीन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:29 AM