- अविनाश कदम
आष्टी : तालुक्यातील सोलेवाडी येथे गुरुवारी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान ज्वारीला पाणी देण्याऱ्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने झडप मारली. हिम्मत राखून शेतकऱ्याने जोरदार प्रतिकार केल्याने त्याचा जीव वाचला आहे. विकास झगडे ( 60 ) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला व पायाच्या पंजाला जखम झाली आहे. दरम्यान, हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
सोलेवाडीमधील विकास झगडे हे शेतकरी सकाळी आपल्या शेतात ज्वारीला पाणी देत होते. अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली. मात्र त्यांनी हातातील कोयता आणि बैलाचे घागडमाळ याच्या सहाय्याने जोरदार प्रतिकार केला. यामुळे त्यांचा जीव वाचला. हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले असून आष्टी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. याबाबत डॉ. रूपाली बागर यांनी त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सागितले आहे. दरम्यान, वन क्षेत्रपाल शाम शिरसाट नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच घटनास्थळी आ. सुरेश धस यांनी धाव घेऊन शेतकरी विकास झगडे यांची विचारपूस केली. सोलेवाडीतील शेतकर्यांना सावध राहण्याचे त्यांनी सांगितले.
नागरिक भयभीत परिसरात वनविभागाचे अनेक पथके तैनात असूनही बिबट्या अद्यापपर्यंत जाळ्यात अडकला नाही. यामुळे पारगाव, सोलेवाडी, जामगाव, आष्टा, आंधळेवाडी या परिसरातील शेतकरी व नागरिकांत भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.