केज (जि. बीड) : तालुक्यातील चंदनसावरगाव येथे एका ट्रकला जीप आडवी लावून चालकाला मारहाण करून हवेत गोळीबार केल्याची थरारक घटना सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. यामुळे परिसर हादरून गेला आहे. साखर कारखान्याची उचल घेऊन मजूर पुरवठा न केल्याने हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
केज-अंबाजोगाई रस्त्याने अंकुश राठोड ट्रकने जात असताना चंदनसावरगाव येथील बस स्थानकाजवळ बाबा तुळशीराम पोले, बाबू टोम्पे आणि हनुमंत लटपटे (सर्व रा. कोदरी ता. गंगाखेड जि. परभणी) यांनी त्यांची जीप (क्र. एम. एच .२२/ ए. एम. १०८३) आडवी लावून ट्रक अडविला. तुझ्याकडे गंगाखेड शुगर कारखान्याचे पैसे बाकी आहेत. तू कारखान्याला ट्रक व ऊसतोडणी मजूर पाठवले नाहीस, असे सांगत आम्ही कारखान्यांकडून पैसे वसुलीचे काम करतो. तू आता कारखान्याचे तुझ्याकडे बाकी असलेले पैसे आम्हाला दे, अशी मागणी ट्रकचालक अंकुश राठोडकडे केली. यावर अंकुश राठोड याने मी केलेल्या कामाचा हिशोब करू व नंतर बाकी उर्वरित पैसे तुम्हाला देतो, असे सांगताच अंकुश राठोड याला बाबा पोले, बाबू टोम्पे आणि हनुमंत लटपटे या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी अंकुश राठोड याचे नातेवाईक भांडण सोडवण्यास आले असता बाबा पोले याने मी एकालाही जिवंत सोडणार नाही, असे म्हणत त्याने त्याच्या जवळील पिस्तूलमधून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली.
या प्रकरणी अंकुश राठोड याच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात बाबा पोले, बाबू टोम्पे आणि हनुमंत लटपटे या तिघांविरुद्ध दहशत माजविणे तसेच भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे हे तपास करीत आहेत.
गोळीबार केलेले पिस्तूल परवाना असलेलेचंदन सावरगाव येथे सोमवारी दुपारी ज्या पिस्तूलमधून बाबा पोले यांनी हवेत गोळीबार केला, ते पिस्तूल अधिकृत परवाना असलेले आहे. मात्र, त्याचा त्यांनी गैरवापर करून दहशत निर्माण केल्याची माहिती स.पो.नि.डॉ. संदीप दहीफळे यांनी लोकमतला दिली.