माजलगाव : बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे न देता अर्धे पैसे घेऊन ते स्वत:च्या खिशात घालणाऱ्या तीन वाहकांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी माजलगाव आगारात झाली. या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे.डी. बी. साळवे, व्ही. एस. सिरसीवाड, पी. डी. राठोड असे निलंबित केलेल्या तीन वाहकांची नाव आहेत. माजलगाव येथील आगारातून दररोज शेकडो बसेस जातात आणि येतात. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच परिसरातील ग्रामीण भागात धावणाºया बसेसची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावरील बसेसमध्ये वाहक कर्तव्य बदलून घेण्यात कुचराई करतात. रोज रोज त्याच मार्गावरील बसमध्ये कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांना कोणता प्रवासी नियमित आणि कोणता नाही, हे समजते. नियमित प्रवाशांना तिकीट न देता त्यांच्याकडून तिकिटाच्या अर्धे पैसे घ्यायचे आणि ते स्वत:च्या खिशात घालायचे. असा काहीसा प्रकार वाढला होता. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बस तपासली आणि यामध्ये तिन्ही वाहक दोषी आढळले. त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रवाशांनीही पूर्ण तिकिट घेऊनच प्रवास करावा. तिकिट नसेल देत तर ते मागवून घ्यावे, अन्यथा प्रवाशांवरही कारवाई होऊ शकते, असे आगारप्रमुख डी.बी.काळम यांनी सांगितले.
तिकिटाचे पैसे स्वत:च्या खिशात; रापमचे तीन वाहक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:03 AM