बीड : लग्नाला २५ वर्षे झाल्यानंतर घरात पाळणा हलला. एक मुलगा आणि दोन मुली असे तिळे जन्माला आल्याने ५० वर्षे वयाच्या हरिभाऊंना आकाश ठेंगणे झाले.
परळी तालुक्यातील कौठाळी येथील शेतकरी हरिभाऊ यादव घुले यांचे २५ वर्षांपूर्वी लग्न झाले. हरीभाऊंना आणि कुटुंबियांना अपत्य प्राप्तीचे वेध लागले. महिने सरले, वर्षे सरली तरी अपत्याचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते. नवसाचा एकही देव सोडला नाही की कुठला डॉक्टर सोडला नाही, परंतु पदरी निराशाच येत गेली. त्यामुळे पत्नी शकुंतलाबाई यांनी मनाचा मोठेपणा आणि समजूतदारपणा दाखवत हरिभाऊंना दुसऱ्या लग्नासाठी तयार केले.
१० वषार्पूर्वी हरिभाऊंचे दुसरे लग्न औरंगपूर येथील गंगाबाई यांच्याशी झाले. तरी दुर्भाग्याने पिच्छा सोडला नाही. पुन्हा देवाला साकडे, नवसपूर्ती आणि दवाखान्याच्या चकरा सुरू झाल्या. अखेर गंगाबाई गर्भवती राहिल्या. चाचणीदरम्यान त्यांच्या पोटात तिळे असल्याची कल्पना डॉक्टरांना आली होती. मग त्यांनी हरिभाऊंना अधिक काळजी घेण्याचे सांगून मार्गदर्शन केले. अल्पशिक्षित आणि ग्रामीण असूनही हरिभाऊंनी व त्यांच्या पहिल्या पत्नी शकुंतलाबाई यांनी गंगाबाई यांची काळजी घेतली.
अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाचे प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार प्रसूतीच्या संभाव्य तारखेच्या एक महिना आधी गंगाबार्इंना रुग्णालयात दाखल केले. ६ जून रोजी रात्री ११ च्या सुमारास गंगूबार्इंनी एक मुलगा आणि दोन मुलीस जन्म दिला आणि हरीभाऊंची २५ वर्षांपासूनची अपत्यप्राप्तीची प्रतीक्षा संपली. वयाच्या ५० व्या वर्षी हरिभाऊ एकदाच तीन-तीन लेकरांचे बाप झाले. दहा दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर गंगाबाई आणि तिन्ही बाळांना सुट्टी देण्यात आली. सध्या हे सर्वजण गंगाबार्इंच्या माहेरी औरंगपुर येथे आहेत.