सोशल माध्यमातून केलेल्या या मागणीत डॉ. विनोद निकम यांनी पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात नृत्य कलेला खूप महत्त्व आहे. नृत्य कलेतून मिळालेला हा सांस्कृतिक वारसा जपण्याचे व समृध्द करण्याचे काम राज्यातील अनेक नृत्य कलाकार आपल्या नृत्य क्लासेसच्या माध्यमातून करीत आहेत.
नृत्य कलेच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र शासनासहीत अनेक मान्यवर संस्थांनी गौरवलेल्या अनेक नृत्य कलाकारांनी आपल्या उपजीविकेसाठी नृत्य क्लासेस सुरू केलेले आहेत. कोविडचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनच्या नावाखाली हे नृत्य क्लासेस राज्य शासनाने बंद ठेवलेले असल्यामुळे या नृत्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मोठी आर्थिक गुंतवणूक करीत या नृत्यकर्मींनी गेल्या अनेक वर्षांपासून या नृत्य क्लासेससाठी हॉल भाड्याने घेतले आहेत. हे नृत्य क्लासेस गेल्या वर्षभरापासून बंद असल्यामुळे आता
हॉलचे थकित भाडे, घरभाडे, मुलांचा शैक्षणिक खर्च, त्यांची थकित फी, क्लासेससाठी, घर बांधकामासाठी घेतलेले, काढलेले कर्ज आणि कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह कसा करावा, असे प्रश्न लाखो नृत्यकर्मींसमोर उभे आहेत. या सर्व जीवघेण्या प्रश्नामुळे नृत्य कलाकारांसमोर नैराश्येचे वातावरण निर्माण झाले असून, आत्महत्या करण्याचा आत्मघाती विचार नृत्यकर्मींच्या डोक्यात घोंगावण्यापूर्वी राज्यातील नृत्यकर्मींचा भाकरीचा प्रश्र्न सोडविण्यासाठी नृत्य क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी डॉ. विनोद निकम यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोशल माध्यमातून केली आहे.