धारूर : तालुक्यातील भोगलवाडी फाट्याजवळील कारी विद्युत उपकेंद्राचे कंपाऊंड फोडून परळी येथून थर्मलची राख घेऊन धारूरकडे जाणारा टिप्पर आत घुसला. यामुळे विद्युत विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी दिंद्रूड पोलीस स्टेशनमध्ये संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास तेलगाव धारूर या रोडवर असलेल्या कारी उपकेंद्रात वेगाने जाणाऱ्या टिप्परने (क्र. एमएच ४४ ९४८८) संरक्षण भिंत फोडून पाच ते सहा पूल तोडून घुसला. त्यामुळे विद्युत उपकेंद्राचे खूप मोठे नुकसान झाले. याच रोडवरून अमित सद्दिवाल यांनी विद्युतजोडणी घेतली होती त्यांचेही पोल पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे तर सद्दिवाल यांचेही मोठ्या प्रमाणत नुकसान झाले मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. विद्युतवाहिन्याही यामुळे तुटून पडल्या. या उपकेंद्राचे अभियंता विकास जोगदंड यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक या ठिकाणाहून फरार झाला. दिंद्रूड पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतला असून, तपास हेड कॉन्स्टेबल वसंत नागरगोजे करत आहेत.