- पुरुषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील तीन कारखान्याच्या हद्दीत अद्याप सात लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असून, राहिलेल्या उसाचे गाळप पावसाळा सुरू होईपर्यंत करण्याचा शब्द अतिरिक्त ऊस गाळप नियोजन बैठकीत तिन्ही कारखान्यांनी दिला आहे. यातील निम्मा ऊस जयमहेश, तर निम्मा ऊस सोळंके व छत्रपती कारखाना गाळप करणार असल्याचा शब्द दिल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
सोमवारी समर्थ साखर कारखान्यावर औरंगाबाद व नांदेड विभागातील २०२१-२२ ऊस गाळप आढावा व अतिरिक्त ऊस गाळप नियोजन बैठक राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आमदार बाबाजानी दुर्रानी, साखर संचालक पांडुरंग शेळके, प्रादेशिक संचालक शरद जर, नांदेडचे एस. बी. रावळ यांच्या उपस्थितीत सर्व मराठवाड्यातील सर्व कारखान्यांची ही बैठक होती.
या बैठकीत माजलगाव तालुक्यात सात लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. हा सर्व ऊस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप करणार असल्याचा शब्द माजलगावच्या तिन्ही कारखान्यांनी या बैठकीत दिला असल्याची माहिती मिळाली आहे. यापैकी ३ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप एकटा जय महेश करणार असून, उर्वरित ३ लाख ५० हजार मेट्री टन उसाचे गाळप सुंदरराव सोळुंके व छत्रपती साखर कारखाना करणार असल्याचा शब्द देण्यात आला आहे.
जूनपर्यंत कारखाने जरी चालू राहिले तरी आताच पाणी बंद केल्याने तसेच अनेकांचे बोअर व विहीर आटल्याने अनेकांच्या उसाचे सरपन झाल्याशिवाय राहणारच नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे जून पर्यंत कारखान्यांना कितपत चांगला ऊस मिळेल हे सांगणे आज तरी कठीण आहे.
जय महेश कारखान्याने आत्तापर्यंत नऊ लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त उसाचे गाळप केले असून उर्वरित उसापैकी निम्म्या उसाचे गाळप आम्ही करणार आहोत. यासाठी आम्हाला आणखी तीन महिने लागले तरी आम्ही पूर्ण ऊस घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. -गिरीश लोखंडे, उपाध्यक्ष, जयमहेश शुगर्स, पवारवाडी, माजलगाव