मुंबई: भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त परळीजवळील गोपीनाथ गड येथे मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी उपस्थितांना संबोधित केले.
गोपीनाथ गड गावागावात पोहचला पाहिजेनेहमी गोपीनाथ गडावर सगळे नेते, कार्यकर्ते, समर्थक येतात. पण आता यापुढे गोपीनाथ गडावर तुम्ही यायची आवश्यकता नाही. गोपीनाथ मुंडे यांनी गरीबांच्या सेवा करण्याचा जो वारसा दिला आहे, तो आपण गावा-गावापर्यंत पोहोचवू. गरीबातला गरीब, फाटक्यातल्या फाटक्या माणसापर्यंत सेवेचा हा वारसा पोहोचवू. वीटभट्टीवरील कामगार, ऊसतोड कामगार, खडी फोडणाऱ्या सगळ्यांपर्यंत गोपीनाथ गड गेला पाहिजे, असा संकल्प आज करू, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
आजचा दिवस लोकांना समर्पीतगोपीनाथ मुंडेंचा सर्व जाती-धर्म, सर्व पक्षातील लोक, गोरगरीबांसोबत स्नेह होता. आज अनेक जणांनी गोपीनाथ गडावर येऊन गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. अनेक राजकीय नेतेही गडावर आले पण ते पक्षभेद विसरुन. आजचा दिवस माझ्यासाठी नाही. तसाच तो माझाही दिवस नाही. तर आजचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पीत करणार असल्याचा संकल्प करत असल्याचे, मत पंकजांनी व्यक्त केले.
देशातील सर्व नेते गोपीनाथ गडावर नतमस्तक होतातत्या पुढे म्हणाल्या, मी आजीला नेहमी विचारायचे, आजी मुंडेसाहेब जन्मले तो दिवस नेमका कसा होता. तेव्हा आजीने सांगितले, त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा होती. त्या दिवशी गरीबाच्या घरी गरीबाची काम करणारा राजा जन्मला. म्हणून तर आज लोक पोवाडे, भारूडाच्या माध्यमातून त्या राजाचे गुणगान गातात. देशातील सर्व नेते इथे आले की गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊनच जातात. कारण त्यांनी सगळ्या विचारांशी, जातींशी सलोखा निर्माण केला. त्यांचा हाच वसा पुढे चालवण्याचा दिवस आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
उसतोडणी कामगारांशी संवादगोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर असंख्य समर्थकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर पंकजा मुंडे थेट उसाच्या फडात गेल्या. तिथे त्यांनी ऊसतोडणी कामगारांसोबत वेळ घालवला. कार्यक्रमात येण्यापूर्वी पंकजांनी परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ केला. यावेळी खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टे, नमिता मुंदडा इत्यादी नेत्यांचीही उपस्थिती होती.