बीड : दिवाळी सुटी संपल्यानंतर आजपासून शाळा गजबजणार आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने २३ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबरपर्यंत सुटी जाहीर केली होती. निवडणूक आणि अन्य कारणांमुळे वार्षिक सुटीच्या वेळापत्रकात अंशत: बदल करुन ही सुटी जाहीर केली होती. १२ रोजी गुरुनानक जयंतीची सुटी असल्याने १३ नोव्हेंबरपासून सर्व शाळा नियमित सुरु करण्याबाबत शिक्षणाधिकारी (प्रा.) सुदाम राठोड यांनी आदेश दिले होते. त्यामुळे १३ नोव्हेंबरपासून द्वितीय शैक्षणिक सत्रास सुरुवात होत आहे.शाळेचा पहिला दिवस असल्याने विविध शाळांना भेटी देण्याबाबत शिक्षण विभागाने नियोजन केल्याचे समजते. तसेच शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात सुरु होणाऱ्या व्हर्च्युअल क्लास रुमबाबातही येत्या काही दिवसात तत्परतेने कार्यवाही होणार आहे. २० दिवसांच्या सुटीनंतर शाळा पुन्हा गजबजणार आहेत.स्थलांतराचे आव्हानसुटी संपल्याने व ऊसतोडणीचा हंगाम असल्याने विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.सुटीच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोणत्या शाळेत पडझड झाली याची पाहणी करावी लागणार आहे.
आजपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:01 AM