चौसाळा : बीड तालुक्यातील चौसाळा येथील बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. महिलांसाठी असलेले शौचालय बंद असल्यामुळे त्यांचीदेखील कुचंबणा होत आहे. आगारप्रमुखांनी लक्ष देत स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून गैरसोय दूर करण्याची मागणी आहे.
स्टेडियम परिसरात स्वच्छता होईना
बीड : शहरातील सहयोग नगर भागातील स्टेडियम परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व्यापारी येथील रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने सर्वत्र घाण दिसून येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. स्वच्छतेची मागणी आहे.
नेकनूर ते नांदूर रस्त्याचे तीनतेरा
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर ते केज तालुक्यातील नांदूरघाट या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. दोन्ही गावे मोठ्या बाजारपेठेची असल्यामुळे रहदारी कायम असते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
रस्त्यावर खड्डेच खड्डे
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण परिसरात टाकरवण ते टाकरवणफाटा-राजेगाव या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच खड्ड्येमय रस्त्यांवरून वाहने वाहतूक करीत आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे.
सांडपाणी रस्त्यावर
बीड : शहरातील शाहूनगर परिसरात नाल्या तुंबलेल्या असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. नळाचे पाणी सोडल्यानंतर जास्तीचे पाणी रस्त्यावर येते. रस्त्यावर खड्डे पडलेले असून, याच खड्ड्यात हे सांडपाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्तीदेखील वाढत आहे.