संजय तिपाले
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्याची पायरी चढणाऱ्या प्रत्येकाला गुन्हा कुठे घडला, हा पहिला प्रश्न केला जातो. हद्द संबंधित पोलीस ठाण्याची असेल तर ठीक; अन्यथा इतर पोलीस ठाण्यांची हद्द असल्यास तिकडे बोट दाखविले जाते. हद्द न पाहता पोलिसांचा तत्काळ प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही.
सीआरपीसी १५४प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे तिथेच गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. हद्द दुसऱ्या ठाण्याची असल्यास नंतर तो त्या ठाण्याकडे वर्ग करणे अपेक्षित आहे. मात्र, हद्दीचे कारण देत तक्रारदारांना सर्रास या ठाण्यातून त्या ठाण्यात फिरविले जाते.
गुन्ह्यांचा वाढता आलेख, कामाचा व्याप, अपुरे मनुष्यबळ आणि तपासाची डोकेदुखी यामुळे ठाणे अंमलदारांकडून हद्दीबाहेरचे गुन्हे नोंदवून घेतले जात नाहीत, असे पोलीस सुत्रांनी सांगितले. शहरात नवख्या असलेल्या तक्रारदारांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागतो. पोलिसांच्या तत्काळ प्रतिसादाची अपेक्षादेखील यामुळे फोल ठरली ठरते. हद्दीचे मोजमाप न लावता तक्रार नोंदवून घेत तपास गतिमान करण्यासाठी सर्व ठाण्यांच्या प्रमुखांमध्ये समन्वयदेखील महत्त्वाचा आहे. __ जिल्ह्यात पोलीस ठाणे २८ पोलीस अधिकारी १८० पोलीस अंमलदार २१९० _
तक्रार दाखल करून न घेतल्यास कारवाई
पोलिसांचा तत्काळ प्रतिसाद मिळावा, यासाठी डायल ११२ ही सुविधा लवकरच सुरू केली जाणार आहे.
याशिवाय जिल्ह्यातील सर्व ठाणे हद्दीत १,५०० हॉटस्पॉट निश्चित करण्यात आले असून, तेथे पोलीस हमखास भेट देणार आहेत.
पोलीस ठाण्याची हद्द न पाहता नागरिकांना तातडीने प्रतिसाद द्या, असे निर्देश पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिलेले आहेत.
मात्र, प्रत्यक्षात हद्द पाहूनच गुन्हे दाखल करून घेतले जातात. हद्दीमुळे तक्रारी नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाईदेखील केली जाऊ शकते. __
अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याला प्राधान्य द्या. कुठल्याही परिस्थितीत तक्रारदारांना निराश करू नका, गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन तो नोंदवून घ्या व नंतर संबंधित ठाण्यात वर्ग करा, असे निर्देश दिलेले आहेत. अशा पद्धतीने काही गुन्हे दाखल करून ते वर्गदेखील केले आहेत.
-आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड