बीड : डीजे वाजवू नये, अशी नोटीस दिल्यानंतरही तो वाजविण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी डीजे मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बीड शहरात ७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास विवाह होता. याच लग्नात काळभोर यांच्या मालकीचा जय गणेश हा डीजे वाजणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी लगेच डीजे मालकाला सीआरपीसी कलम १४९ नुसार नोटीस दिली. परंतु तरीही काळभोर यांनी हिंमत करत रात्रीच्या वेळी हा डीजे वाजविला. शिवाजीनगर पोलिसांची गस्त सुरू असताना त्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी याची गंभीर दखल घेत डीजे मालकासह वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अंमलदार अभिजित सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेश शेजूळ हे करत आहेत.
टेम्पो नव्हे तर डीजेसाठी १० टायरचा ट्रकआतापर्यंत आपण ट्रॅक्टर, टेम्पो, पिकअप आदी वाहनांमध्ये डीजे वाजल्याचे पाहिले असेल. परंतु या विवाह सोहळ्यात तब्बल १० टायरच्या ट्रकमध्ये डीजे वाजविण्यात आला होता. याचा आवाज अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविणारा होता. आरटीओची परवानगी न घेता वाहन मोडिफाय केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करून हा डीजे व वाहन जप्त केले आहे. परंतु यातील काही साहित्य संंबंधिताने गायब केल्याचीही माहिती आहे. परंतु याबाबत शिवाजीनगर पोलिसांना कसलीच माहिती नसल्याचेही समोर आले आहे. पोउपनि शेजूळ यांनी याबाबत माहिती घेतो, अशी प्रतिक्रिया दिली.