लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : लग्नाचे आमिष दाखवून येथील एका १५ वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी आरोपीस संभाजीनगर पोलिसांनी ८ जुलैरोजी रात्री अटक केली आहे.
शहरातील एका पंधरा वर्षीय मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून परळी तालुक्यातील एका गावातील जनक दगडू यादव या व्यक्तीने ओळख वाढविली. शहरातील एका लॉजवर आणून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तसेच शहरात किरायाने घेतलेल्या खोलीवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर तिला जातीवाचक शिवीगाळ केली. दमदाटी करून तिला सोडून निघून गेला. हा प्रकार २० जून ते ४ जुलै २०२१ दरम्यान घडला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून जनक यादव याच्याविरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांनी बुधवारी रात्री घटनास्थळी भेट दिली असून, ते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.