बीड : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुकाराम भानुदास शिंदे (रा. बीड) यास दोषी ठरवून १० वर्षे सक्त मजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा येथील विशेष सत्र न्या. नाझेरा शेख यांनी सुनावली. २८ आॅगस्ट रोजी हा निकाल देण्यात आला.११ आॅक्टोबर २०१६ रोजी संध्याकाळी ७ वाजता फिर्यादीची अल्पवयीन मुलगी बाहेर खेळण्यासाठी गेली असता फिर्यादीच्या घरासमोर राहणाऱ्या तुकाराम भानुदास शिंदे याने त्या मुलीस घरात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने बीड शहर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तुकाराम शिंदेविरुद्ध बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर उपनिरीक्षक एम. बी. जोगदंड व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांनी सखोल तपास करुन आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात केले. हे प्रकरण विशेष सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आलेले होते. या प्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात आले.फिर्यादी, अल्पवयीन पीडित मुलगी, इतर साक्षीदारांचे जवाब, वैद्यकीय पुरावा व इतर परिस्थितीजन्य पुराव्याचे अवलोकन करुन व जिल्हा सरकारी वकील अजय दि. राख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन विशेष सत्र न्या. नाझेरा शेख यांनी आरोपी तुकाराम शिंदे यास दोषी धरुन दहा वर्षे सक्त मजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी एएसआय धनवडे, पो. हे. कॉ. एस. डी. जाधव यांनी सहकार्य केले.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वृद्धाला दहा वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:25 AM