गेवराई (बीड ) : तालुक्यातील भोजगावं येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने बुधवारी (दि. १७ ) रात्री विषारी द्रव्य टाकल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण पाणी दुषित झाले असून शेतकऱ्याच्या निदर्शनास हे आल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तालुक्यातील भोजगावं येथील शेतकरी रावसाहेब शिंदे यांचे गावालगत शेतजमीन असून त्यात विहिर आहे. याच विहिरीचे पाणी खाजगी टॅकरने गावात तसेच देवपिपंरी, भाटआंतरवाली ,कोमलवाडी, राजपिपंरी या भागात दिले जाते. बुधवारी सकाळी शिंदे विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता त्यांना विषारी द्रव्याचा वास उग्र वास आला. त्यांनी अधिक तपासणी केली असता पाण्यात विषारी द्रव्य टाकल्याचे लक्षात आले. शिंदे यांनी तत्काळ याची माहिती गेवराई पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पोलीस सतिष खरात व परमेश्वर तागड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे,नारायण खटाने यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी पाण्यात टाकलेल्या विषारी द्रव्याच्या दोन बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. गावात आणि आजूबाजूस येथून पाणी जात असल्याने मोठी दुर्घटना टळली.