लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदूसरा धरणाच्या पाण्याची पातळी स्ट्रेनर वॉलच्या खाली गेल्यामुळे या ठिकाणी आता ट्रॅक्टर चलित पंपाद्वारे पाणी घेण्यात येणार आहे. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी या पंपाचा प्रारंभ करून पाणी साठ्याचा आढावा घेतला. या धरणातून चार एम.एल.टी. पाणी घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.बीड शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा करणाºया बिंदूसरा धरणाच्या पाण्याची पातळी मृतावस्थेत असून, सध्या असलेले पाणी किमान महिनाभर पुरेल एवढे आहे. मात्र, या ठिकाणी स्ट्रेनर वॉल आहे त्याकडे असणाºया चारीला पाणी पोहोचत नाही. पाण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी स्ट्रेनर वॉलकडे पाणी घेण्याकरीता ट्रॅक्टरचलित पंप बसवण्याची संकल्पना मांडली. शनिवारी सायंकाळी डॉ. क्षीरसागर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा पंप सुरु करण्यात आला. या ठिकाणी २४ तास हा पंप सुरु राहणार असून, दोन ट्रॅक्टरच्या माध्यमातून हे पाणी स्ट्रेनर वॉलकडे ओढण्यात येणार आहे. दररोज चार एम.एल.टी. पाणी घेतल्यास माजलगाव आणि बिंदूसरा दोन्हीकडच्या पाणी पुरवठयामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.यावेळी नगरसेवक विलास विधाते, विनोद मुळूक, न.प.चे पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.
बिंदूसरा धरणातून ट्रॅक्टरचलित पंपाने पाणी ओढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:23 AM