अंबाजोगाई : उसतोडणीसाठी परळी तालुक्यातून कर्नाटक राज्यात मजूर घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्राॅली अंबाजोगाई रोडवर धारोबाच्या घाटात दिडशे फुट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात ट्राॅलीत बसलेली उसतोड कामगार महिला जागीच ठार झाली तर अन्य चार जखमी आहेत. जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. हा अपघात रविवारी (दि.१७) रात्री झाला.
दरवर्षी प्रमाणे सध्या उसतोडणीसाठी बीड जिल्ह्यातून पर राज्यात जाणाऱ्या कामगारांची लगबग सुरु आहे. आसोलअंबा येथील मुकादमच्या माध्यमातून परिसरातील आसोलआंबा तांडा, दौनापूर येथून काही कामगार ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत बसून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी रविवारी दुपारी निघाले होते. ते अंबाजोगाई रस्त्यावरील धारोबाच्या घाटात आले असता ट्रॅक्टरच्या हेडला जोडणारी पिन निखळल्याने ट्राॅली बाजूला निघाली आणि शेजारच्या दिडशे फुट खोल दरीत कोसळली. या अपघातात ट्राॅलीत बसलेल्या सागरबाई सुंदर जाधव (वय ३५, रा. आसोलआंबा तांडा, ता. परळी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, सुमित्रा केशव राख (वय २६), मुंजाहारी केशव राख (वय ६) दोन्ही रा. दौनापूर ता. परळी, गंगुबाई चव्हाण (वय ५०), नेहा विलास जाधव (वय ५) दोन्ही रा. आसोलआंबा तांडा, ता. परळी हे गंभीर जखमी झाले. आवाज ऐकून जमा झालेल्या ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमींवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मयत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी गोंधळ सुरु केल्याने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाच्या बाहेर काहीकाळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, उपस्थित सुरक्षा जवानांनी परिस्थिती आटोक्यात आणली.