माजलगाव : येथील मोंढ्यात किराणा व्यापाऱ्यांकडून अत्यावश्यक असलेल्या मालाची चढ्या भावाने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्याने बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दुकानदारांना भेटी देऊन जादा दराने विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे सांगत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली.
कंपनीच्या काही लोकांशी हाताशी धरून काही ठोक किराणा व्यापाऱ्यांनी मागील दोन दिवसापासून चढ्या भावाने विक्री सुरू केले असल्याच्या तक्रारी येत असल्याने या बाबत शनिवारी लोकमतने ' माजलगावात 85 च्या शेंगदाण्याची 110 रूपयांवर उडी ' या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक डक यांनी किराणा व्यापाऱ्यांना भेटी देऊन अत्यावशक सेवांची चढ्या भावाने विक्री केल्यास आपला परवाना रद्द करण्यात येईल असे सांगितले. व याबाबत सचिव हरिभाऊ सवने यांनी व्यापाऱ्यांना तात्काळ नोटिसा बजावल्या व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाने दुकानदार काय भाव माल देतात , दुकानात भाव फलक आहे किंवा नाही, दुकानात जास्त गर्दी करणाऱ्यांना मज्जाव करणे या व इतर बाबींवर लक्ष देणार आहेत.दुकानदारांनी चढ्या भावाने माल देणे सुरू ठेवल्यास त्यांचा दुकान परवाना रद्द करण्यात येणार असून काही दुकानदाराकडे मोठ्या प्रमाणावर साठे असल्याची माहिती मिळाली असून ते देखील पोलिसांना घेऊन जाऊन तपासणी करण्यात येणार आहे.-अशोक डक ,सभापती