वडवणी : जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वडवणीत प्राथमिक आरोग्य केंद्र व कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील इमारतीमध्ये १ ते ५ मार्च दरम्यान रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रभारी तहसीलदार वैशाली पाटील यांनी "कोरोना" टेस्ट मोहिमेत सर्व व्यापारी, कामगार, व्यावसायिकांना सहभागी होण्याचे व तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा व्यवसाय बंद ठेवण्यात येतील, असे आदेशही दिले आहेत. या मोहिमेत डाॅक्टर, वाॅर्डबाॅय, पोलीस, होमगार्ड यांच्यासह शिक्षकदेखील तैनात करण्यात आले आहेत. मोठा फौजफाटा पाच दिवस सहभागी होणार आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील व्यापारी, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, दूध संकलन केंद्र, घरोघरी दूध पोहोच करणारे, खासगी बँकेतील कर्मचारी, दुकानातील कामगार, आदींना आपली टेस्ट करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार वैशाली पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. एम. बी. घुबडे, पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी केले आहे.
व्यापारी, कामगारांची पुन्हा रॅपिड अँटिजेन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:38 AM