- अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई - महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व महाराष्ट्रातील पूर्ण शक्तीपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव हा योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा महोत्सव म्हणून साजरा होतो. १२ व्या शतकात श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराची स्थापना झाली. त्या वेळेपासून मंदिरात आराध बसण्याची परंपरा आहे. मात्र सलग दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून मंदिरात आराध बसण्यासाठी महिला व भाविकांना परवानगी देण्यात आली नाही. शेकडो वर्षानंतर ही परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे. महाराष्ट्रात केवळ अंबाजोगाईतच मंदिरात आराध बसण्याची परंपरा कायम राहिलेली आहे. मात्र ही परंपरा खंडित झाल्याने अनेक भाविकांचा हिरमोड झाला आहे.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी हे पूर्ण शक्तीपीठ आहे. १२ व्या शतकात जयंती नदीच्या तिरावर योगेश्वरी मंदिराची स्थापना झाली असल्याचे येथील शिलालेखात नमूद आहे. पूर्वी नगराची रचना ही नदीच्या काठी असायची. त्याच उद्देशाने १२ व्या शतकापूर्वी अंबाजोगाई शहर हे रेणुकादेवी परिसरात असणाऱ्या मूळ जोगाई या देवीच्या आजूबाजूला असावे. असा उल्लेखही केला जातो. मात्र कालांतराने काही प्रसंग उद्भवल्याने १२ व्या शतकात योगेश्वरी मंदिराची हेमाडपंथी पद्धतीने उभारणी झाली. मूर्तीकला विकसित होण्याअगोदर देवीचा अवतार हा तांदळ्याचा असायचा. असेच देवीचे तांदळे महाराष्ट्रात अंबाजोगाई व माहूर या दोनच शक्तीपिठाच्या ठिकाणी आहेत. १२ व्या शतकात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभमुहुर्तावर योगेश्वरी मंदिराची स्थापना झाली. आणि ही पौर्णिमा योगेश्वरी देवीच्या जन्माचा उत्सव म्हणून मार्गशीर्ष पौर्णिमेला योगेश्वरी देवीची मोठी यात्रा भरते.
योगेश्वरी देवीच्या स्थापनेचा दिवस धरून पूर्वीचे नऊ दिवस असा नवरात्र महोत्सव अंबाजोगाईतील भाविकांनी सुरू केला. या महोत्सवाच्या कालावधीत भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात यासाठी योगेश्वरी मंदिरात आराध बसण्याची परंपरा १२ व्या शतकातच सुरू झाली. ती परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगेश्वरीचा नवरात्र महोत्सवही भाविकाविनाच साजरा झाला. मंदिरे खुली झाली. मात्र, सामजिक अंतर, मास्कचा वापर व मंदिरात दर्शनाचा कालावधी याच्या वेळा ठरलेल्या असल्याने तसेच भाविकांना आजही श्री योगेश्वरीचे दर्शन बाहेरूनच घ्यावे लागते. आत गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. आता मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवात योगेश्वरी देवल कमिटीने दर्शनाची व्यवस्था दूर अंतरावरूनच केली आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महोत्सवात किमान पंधरा हजार महिला मंदिरात आराध बसतात. या महिला भाविकांना आराध बसण्यासाठी सर्व सोयी व सुविधा मंदिर प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातात. वर्षानुवर्षे आराध बसणाºया महिलांची संख्या वाढतच चालली आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रथा बंद राहिल्याने अनेक महिला भाविकांमध्ये आपण नवरात्र महोत्सवात योगेश्वरी देवीपासून दुरावल्याची भावना निर्माण झाली आहे.
१० डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान मार्गशीर्ष महोत्सवमहाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान तथा अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव १० डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मंदिरात महिलांना व भाविकांना आराध बसण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन देवल कमिटीचे सचिव अॅड. शरद लोमटे यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेच्या उपाययोजना म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.शुक्रवार पासुन मार्गशीर्ष महोत्सव प्रारंभ होत असल्याने मंदिराची स्वच्छता, रंगरंगोटी, मंदिराचे सॅनिटायझेशन करून घेण्यात आले आहे. तसेच भाविकांना दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवून, मास्कचा वापर करून दर्शन घ्यावे. व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अॅड. शरद लोमटे यांनी केले आहे.