पर्यावरणास धोका; कारवाईची मागणी
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदा नदीपात्रामध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी केली जात आहे. महसूल, पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्याने वाळू उपसा सुरूच आहे.
वीज गायब होत असल्याने संताप
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तासन् तास वीज गायब राहत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. महावितरणने योग्य कारवाई करून वीज सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
बाजारतळ स्वच्छ करण्याची मागणी
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील बाजारतळ तसेच बाजारपेठेत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतकडे स्वच्छतेची मागणी करूनदेखील स्वच्छता केली जात नाही. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
अपघातास निमंत्रण
बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागात सध्या खासगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे.
प्रवाशांची लूट
शिरूर कासार : तालुक्यातील ग्रामीण परिसरात विविध भागात खासगी प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. खासगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या ग्रामीण प्रवाशांकडून जादा भाडे घेऊन लुटण्याचे प्रकार वाढत आहे.