चोरीच्या घटना वाढीने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लहान-मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे घराला कुलूप लावून गेल्याने चोरट्यांना आयतेच रान मिळाले. परिणामी घरफोड्या वाढल्या, तसेच मोटारसायकलची शहरात मोठ्या प्रमाणात चोरी वाढली आहे. या वाढत्या चोऱ्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
मंडी बाजारात
घाणीचे साम्राज्य
अंबाजोगाई : शहरातील मंडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज सकाळी विक्रीसाठी येणारा भाजीपाला विक्री झाल्यानंतर उरलेल्या भाज्या तिथेच रस्त्यावर टाकल्या जातात. या भाज्या खाण्यासाठी मोकाट जनावरे मंडी बाजारात असतात. रस्त्यावर पडलेल्या या भाज्यांमुळे दुर्गंधी व माशा बसून मोठ्या प्रमाणात घाण तयार होते.
आदर्श नगरातील रस्त्याची दुरुस्ती
बीड : शहरातील आदर्श नगरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा आकार वाढत होता. त्यामुळे पादचारी, वाहनचालक त्रस्त होते. दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून केली होती. या मागणीची दखल घेऊन या भागातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु काम संथगतीने होत असल्याने अनेक ठिकाणी साहित्य रस्त्यावरच पडून असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. रस्ता काम गतीने करण्याची मागणी होत आहे.