अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चार चाकी व दुचाकी वाहने पार्किंग होत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे होत आहेत. शहरातील बसस्थानक ते सायगाव नाका या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अस्ताव्यस्तपणे वाहने लावली जातात. परिणामी रस्त्यावरून चालतांना व वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहनधारकांची वाहने या उभ्या वाहनांना धडकून अपघात होत आहेत. यामुळे वादाचे प्रसंगही यावेळी घडत आहेत. वाढत्या रहदारीमुळे अनेक वेळा रस्त्यातच रखडत उभी राहण्याची वेळ शहरवासियांवर येत आहे.
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी निवारे आहेत. यावर्षी झालेल्या वादळी पावसाने प्रवासी निवाऱ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने, तर अनेक ठिकाणचे बसण्यासाठीचे ओटे फुटल्याने प्रवासी जनतेसाठी ते निकामी ठरले आहेत. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये छत गळू लागल्याने या निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. हे प्रवासी निवारे दुरुस्त करावेत अशी मागणी होत आहे.
बचावासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम
अंबाजोगाई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क हेच प्रभावी माध्यम आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात व सर्वच ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. या वाढत्या गर्दीमुळे संसर्गाचा धोका पुन्हा उद्भवू शकतो. संभाव्य कोरोनाची लाट ओळखून शहरवासीयांनी दक्षता बाळगावी व मास्क हेच कोरोनावरील प्रमुख औषध समजून प्राधान्याने मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जत आहे.
तलाठी नसल्याने कामे होईनात
माजलगाव : तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही ठिकाणच्या इमारती अनेक महिन्यांपासून धूळखात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. सज्जावर तलाठ्यांना थांबणे बंधनकारक असताना शासन नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. परिणामी गरजू शेतकरी, ग्रामस्थांना तलाठ्याचा शोध घ्यावा लागत आहे. परंतु तलाठी सापडत नसल्याने काम रखडत आहेत.