बीड : कागदपत्रांची विचारणा केल्याने एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना गुरूवारी दुपारी वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीसमोर घडली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे.परशुराम ज्ञानदेव माने (३६ रा. हातोला पारगाव जि.बीड ह.मु. फयाज नगर एमआयडीसी वाळूज ता.जि.औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असून एस.एम.सावंत मारहाण झालेल्या कर्मचाºयाचे नाव आहे. माने हा कार्यक्रमानिमित्त बीडला आला होता. परत गावी जात असताना त्याची दुचाकी (एमएच २० सीपी ५३६६) पोलीस चौकीसमोर सावंत यांनी अडविली. लायसन्सची विचारणा केल्यावर त्याने औरंगाबादला असल्याचे सांगितले. दंड भरा म्हणल्यावर अरेरावी करीत दंड भरण्यास नकार दिला. दंड पाहिजे असल्यास औरंगाबादला चला, असा उलट प्रश्न केला. त्याची दुचाकी खाली घेण्यास सांगितल्याने त्याला राग अनावर झाला आणि त्याने खाली उतरत सावंत यांंची गचांडी धरून पोटात मारले. त्यामुळे ते खाली कोसळले. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत हा वाद मिटविला.ही सर्व माहिती पो.नि. राजीव तळेकर यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यानंतर मानेला शिवाजीनगर ठाण्यात नेले. रात्री ७ वाजता त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणण्यासह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
कागदपत्रांची विचारणा केल्याने वाहतूक पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:27 AM
कागदपत्रांची विचारणा केल्याने एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत मारहाण केली.
ठळक मुद्देबीडमधील प्रकार : दुचाकीस्वारावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा