बीड : जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसआयटी असून याचे तपास अधिकारी बीडचे डीवायएसपी विश्वांभर गोल्डे आहेत. परंतू त्यांच्याकडून तपासात काहीच गती मिळाली नाही. उलट त्यांच्या अधिनस्त असलेल्या पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने तब्बल एक कोटींची लाच मागितली. आता ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या गुन्ह्याचा तपासही गोल्डे यांच्याकडेच आला आहे. परंतू हा तपास गोल्डे यांच्याकडून काढून तो जिल्ह्यातील कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी ज्ञानराधाच्या ठेविदारांमधून केली जात आहे. गोल्डे यांच्यासमोरच काही ठेविदारांनी प्रशासन मॅनेज असल्याचा थेट आरोपही शुक्रवारी केला होता.
ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे व संचालक मंडळाविरोधात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात ११ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार आहे. आगोदरच ही शाखा हरिभाऊ खाडे याच्यामुळे बदनाम झाली आहे. आता याच शाखेत पुन्हा ६ लाखांपेक्षा अधिक ठेविदार असलेल्या ज्ञानराधाचा तपास आला आहे. ठेविदारांच्या रेट्यामुळे बीड पोलिसांनी चेअरमन सुरेश कुटे यांना अटक केली आहे. परंतू याचा तपास प्रामाणिकपणे करण्यासाठी तो आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी ठेविदार करत आहेत.
दरम्यान, जिजाऊच्या गुन्ह्यात एसआयटी आहे. याचे प्रमुख अपर पाेलिस अधीक्षक सचिन पांडकर व तपास अधिकारी बीडचे उपअधीक्षक विश्वांभर गोल्डे आहेत. यांच्याकडून अद्यापर्यंत ठेविदार समाधानी होतील, असा तपास झालेला नाही. बबन शिंदे याच्या तपासासाठी पाच पथके आहेत, परंतू त्यांनी अद्यापही अटक केली नाही. असे असतानाच याच एसआयटीतील सहायक तपास अधिकारी हरिभाऊ खाडे याने तब्बल एक कोटींची लाच मागितली. त्याच्या घरातही एक कोटी ८ लाखांची रोकड आणि एक किलो सोने, साडे पाच किलो चांदी असे घबाड सापडले होते. त्यानंतर ठेविदारांनी संताप व्यक्त केला होता. याच प्रकरणात वरिष्ठांचा जबाबही घेतला होता. परंतू यात आपला काहीही संबंध नाही, असे म्हणत सर्वांनीच हात झटकले होते. परंतू वरिष्ठांचे पाठबळ असल्याशिवाय खाडे एवढी हिंमत करू शकतो का? असा सवाल उपस्थित करत ठेविदारांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच संशय व्यक्त केला होता. त्यातच आता ज्ञानराधाचा तपासही याच संशय व्यक्त केेलेल्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. तो कितपत प्रामाणिक होईल, असा संशय ठेविदारांना आहे, त्यामुळेच गोल्डे यांच्याकडून तपास काढत तो आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात तीन आयपीएस अधिकारीजिल्ह्यात सध्या तीन आयपीएस अधिकारी आहेत. त्यातील एक पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत. ते याचा तपास करू शकत नाहीत. केजचे सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मिना आणि माजलगावचे धीरजकुमार बच्चू हे दोघे आयपीएस आहेत. त्यांच्याकडे हा तपास द्यावा, अशी मागणी होत आहे.