सोमनाथ खताळ, बीड: जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, विशेष तज्ज्ञ संवर्गातील २२ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी दुपारी शासनाने काढले होते. परंतू याला २४ तासांतच स्थगिती दिली आहे. आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान सुरू असल्याने या बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिल्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे रूजू होण्यासाठी निघालेले काही अधिकारी अर्ध्या रस्त्यातून परतले आहेत.
राज्यातील १७ अधिकाऱ्यांना सहसंचालक, उपसंचालक तर पाच जणांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना दिली होती. यात जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती. यातील काही अधिकाऱ्यांना पदावनत करून पदस्थापना दिली होती. सोमवारी हे अधिकारी रूजू होण्याच्या तयारीत होते. त्यासाठी कोणी शनिवारी दुपारीच निघाले होते तर कोणी रविवारी निघणार होते. परंतू या बदल्यांना २४ तासांच्या आतच आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी स्थगिती दिली आहे. 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान सुरू असल्याचे कारण त्यांनी पत्रात दिले आहे. याबाबत आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत, संचालक डॉ.साधना तायडे यांना वारंवार संपर्क केला, परंतू त्यांनी फोन न घेतल्याने बाजू समजली नाही.
एका दिवसात काय फरक पडणार?
आरोग्य मंत्री सावंत यांच्या संकल्पनेतून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हे अभियान नवरात्र उत्सव काळात सुरू झाले होते. परंतू महिलांचा अल्प प्रतिसाद पाहता याला दिवाळीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतरही कमीच तपासणी झाली. पुन्हा १५ नोव्हेंबरपर्यंत याला मुदतवाढ दिली. आता हे अभियान संपण्यास दोन दिवस बाकी असून त्यातही एका रविवारचा समावेश आहे. मग सोमवारी अभियान संपत असतानाही कारण देऊन बदल्यांना स्थगिती देण्यामागचा उद्देश काय? असा सवाल उपस्थित होत आहे. बदल्या करण्याची आरोग्य मंत्र्यांना नव्हती का? होती तर अचानक का स्थगिती दिली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, ज्येष्ठता व इतर तांत्रीक अडचणी असल्याने काही अधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळेच याला स्थगिती दिल्याची चर्चा आरोग्य विभागात आहे.
आदेश दोन, परंतू क्रमांक सारखाच
शासनाने शुक्रवारी दोन आदेश काढले. दोन्हीचे शासन आदेश क्रमांक सारखेच (शासन आदेश क्रमांक : बदली - २०२२/प्र.क्र.३१४/सेवा२) आहेत. शासनाच्या वेबसाईटवर मात्र सांकेतांक क्रमांक वेगवेगळे आहेत. पत्रात याच आदेश क्रमांकाचा उल्लेख केल्याने दोघांनाही स्थगिती समजली जात आहे. परंतू त्यातच जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग असा स्पष्ट उल्लेख असल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकारीही धास्तावले आहेत. शासनाच्या या गोंधळामुळे इकडे अधिकारी, कर्मचारीही गोंधळल्याचे दिसत आहेत.