मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्या दि.३ फेब्रुवारी रोजीच्या बैठकीतील सूचनेनुसार सुंदर माझे कार्यालय , माझा गाव सुंदर गाव हे अभियान सुरू आहे. याच अभियानाअंतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत मु.का.अ. यांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय दवाखाने कायापालट अभियान चालू असून हे सर्व लोकवाट्यातून करायचे आहे. यासाठी स्वतंत्र असा निधी नसल्याने आपापल्या दवाखाना हद्दीतील ग्रामपंचायतने यासाठी सहकार्य भावनेतून वित्त आयोग, ग्रामपंचायत निधी अथवा अन्य मार्गांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचे पत्र देण्यात आले आहे. कायापालट अभियानातून इमारत रंगरंगोटी, शासकीय योजना माहिती फलक, पशु पालकांसाठी ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा, गरजेपुरते फर्निचर, दवाखान्यात नळ कनेक्शन व शौचालय सुविधा, पशुवैद्यकीय सेवेसाठी अद्ययावत उपकरण खरेदी, मूलभूत सुविधा आणि दवाखान्याचे सुशोभिकरण या गोष्टी अपेक्षित असून, तालुक्यात शिरूरसह रायमोह, घाटशिळपारगाव, ब्रम्हनाथ, वेळंब, खालापुरी, पिंपळनेर, जाटनांदूर आणि मानूर असे आठ दवाखाने असून, या सर्वांचा कायापालट खर्च जवळपास अडीच ते तीन लाखांपर्यंत अपेक्षित आहे. यासाठी लोकवाटा हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तो मिळेल असा आशावाद पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्त केला जात आहे. विहित वेळेत हे कायापालट अभियान सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जात असून पंचायत समिती, ग्रामपंचायत, पशुपालक तसेच पशुप्रेमींनी आपला या अभियानात खारीचा वाटा घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.
आठ पशुवैद्यकीय दवाखान्याचा कायापालट; ५२ ग्रामपंचायतींसह लोकवाटा अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:31 AM