बीड: दोन मालवाहू जीप व एका टेम्पोत दाटीवाटीने ४० गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याचा प्रकार पाटोदा तालुक्यात २० ऑगस्ट रोजी उघडकीस आला. जामखेड (जि.अहमदनगर) येथील आठवडी बाजारातून बीडकडे कत्तलखान्यात निघालेली ही तिन्ही वाहने पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने चुंबळी फाट्यावर पकडली. त्यामुळे या जनावरांना जीवदान मिळाले. यावेळी पाच जणांना ताब्यात घेतले.
जामखेड येथे शनिवारी आठवडी बाजार असतो. तेथील बाजारातून बीडच्या कत्तलखान्यात काही व्यापाऱ्रूी तीन वाहनांतून ४० गोवंशीय जनावरे आणत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी कारवाईचे आदेश देताच विशेष पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी सहकाऱ्यांसमवेत पाटोदा ठाणे हद्दीतील चुंबळी फाटा येथे सकाळी ११ वाजता सापळा रचला. तीन वाहनांत दाटीवाटीने तब्बल ४० जनावरे कोंबलेली आढळली.त्या जनावरांची सुटका करुन तिन्ही वाहनांचे चालक व इतर अशा एकूण पाच जणांना ताब्यात घेतले. वाहनांसह गुरे अशा २५ ते ४० लाख रुपयांच्या मुद्देमालासह पाच आरोपींना पाटोदा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.