प्रभात बुडूख
बीड : कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर बीड जिल्ह्यातून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे - मुंबई व इतर शहरात जाणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. दरम्यान, राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त ट्रॅॅव्हल्सचीदेखील भाडेवाढ झाली असून, मुंबईसाठी ७०० ते ८०० रुपये आकारले जात आहेत, तर पुण्यासाठी ५०० ते ६०० रुपये तिकीट आहे.
कोरोनामुळे प्रवासी वाहतूक बंद होती. त्या काळात ट्रॅव्हल्स चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. दरम्यान, रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रवासासाठी पुन्हा मुभा देण्यात आली आहे. या काळात डिझेल दरवाढ झाल्यामुळे प्रवासी वाहतूक दरदेखील जवळपास १०० ते १५० रुपयांनी वाढवले आहेत. सणासुदीच्या दिवसांत प्रवासी संख्या लक्षात घेत ही दरवाढ कमी जास्त होते. गर्दी जास्त असेल तर, भाव काही प्रमाणात वाढवले जात असल्याचे चित्र आहे.
या मार्गावर ट्रॅव्हल्स भाडेवाढ
मार्ग आधीचे भाडे आता
बीड ते मुंबई ५०० ते ६०० ७०० ते ९००
बीड ते पुणे ३५० ते ४०० ५०० ते ६००
ट्रॅव्हल्सची संख्या दुप्पट
१ बसस्थानकातून पुणे, मुंबईसाठी बस आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी आरामदायी प्रवास करण्यासाठी ट्रॅव्हल्सकडे नागरिकांचा कल असल्याचे चित्र आहे.
२ ट्रॅव्हल्सच्या संख्येतदेखील दुपटीने वाढ झाली असून, कोरोनामुळे अनेक ट्रॅव्हल्स मालकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला होता. आता वाहतूक सुरळीत झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
डिझेल दरवाढीमुळे भाडेवाढ
लॉकडाऊनपूर्वी डिझेलचे दर व वाहतूक सुरळीत झाल्यानंतर वाढलेले डिझेलचे दर यामुळे प्रवासी वाहतूक दर वाढवण्यात आलेले आहेत. तसेच प्रवासीदेखील पूर्वीपेक्षा कमी आहेत. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष देत प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी कायम ठेवावी.
ट्रॅव्हल्स मालक, बीड