बीड : प्रवासी हा एसटीचा अन्नदाता आहे. प्रवाशांमध्ये देव पाहा. असे झाले तर एसटी नक्कीच खूप पुढे जाईल. परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर व चांगली सेवा देण्यासाठी तत्पर राहावे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.बीड शहरातील बीड बसस्थानक, आगार व विभागीय कार्यालयाच्या नुतन इमारतीचे भूमिपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री रावते बोलत होते.मंचावर आदित्य ठाकरे यांच्यासह रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. राहुल पाटील सचिन आहिर, उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, विभागीय नियंत्रक जालींदर सिरसाठ, यंत्र अभियंता अशोक पन्हाळकर आदींची उपस्थिती होती.पुढे रावते म्हणाले, मराठवाड्यात ३०, तर राज्यात १९५ ठिकाणी रापमची कामे सुरू आहेत. स्थानकांमध्ये सुविधा देण्यासह बस गाड्यांचे रूप बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे आतापर्यंत ५० वर्षांत कधी झाले नाही, ते आता साडेचार वर्षात शिवसेना करून दाखवित आहे.जिल्ह्यात बीडसह नेकनूर, कडा, आष्टी, अंबाजोगाई, पाटोदा येथेही काम सुरू आहे. राज्यात आणखी ६०० ठिकाणी कामे करण्याचा संकल्प आहे. रापमच्या कर्मचारी वसाहतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु. कुर्ला येथे १००० घरे कर्मचाऱ्यांसाठी बांधले जाणार आहेत. तसेच कर्मचाºयांच्या मुलांना मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वतंत्र रूग्णालय असावे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे रावते म्हणाले. आभार यंत्र अभियंता अशोक पन्हाळकर यांनी मानले.नवा महाराष्ट्र घडवायचाय - आदित्य ठाकरेयुवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले, नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी सध्या शिवसेना प्रयत्न करीत आहे. आम्ही आदित्य संवाद यात्रा सुरू केली. ग्रामीण भागात जाऊन महिला, मुलींची प्रश्न जाणून घेतले. नुसते प्रश्न जाणून घेत नाहीत, तर त्याचे निरसनही केले जात आहे. एसटीच्या संदर्भातील प्रश्नांवर आपण परिवहन मंत्र्यांना निवेदने देणार आहोत. तसेच महाराष्ट्राला दुष्काळ, कर्जमुक्त करून सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दुष्काळमुक्तीसाठी नद्यांमध्ये पाणी आणावे - जयदत्त क्षीरसागररोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. मात्र, बीड जिल्हा अद्यापही कोरडाच आहे. जिल्ह्यात सध्या ६०० टँकरने पाणी पुरवठा होत आहे. परंतु मराठवाडा दुष्काळमुक्तीसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. समुद्रात जाणारे पाणी अडवून गोदावरी, सिंदफणा नद्यांमध्ये सोडावे. हेच पाणी दुष्काळी भागात द्यावे, यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचेही क्षीरसागर म्हणाले.
प्रवासी हा एसटीचा अन्नदाता : दिवाकर रावते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:53 PM
प्रवासी हा एसटीचा अन्नदाता आहे. प्रवाशांमध्ये देव पाहा. असे झाले तर एसटी नक्कीच खूप पुढे जाईल. परिवहन महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्पर व चांगली सेवा देण्यासाठी तत्पर राहावे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.
ठळक मुद्देबीड बसस्थानक, आगार व विभागीय कार्यालयाचे भूमिपूजन : एसटीचे रुपडे बदलत असल्याचा दावा