बीड : ठेवीदारांना १७ ते १८ टक्के व्याज दराचे अमिष दाखवत करोडो रुपयांची फसवणूक उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शुभकल्याण मल्टीस्टेटने केली होती. आता शुभकल्याणच्या अध्यक्षासह संचालकांची मालमत्ता जप्त होणार आहे. या संदर्भात जिल्हाधिका-यांनी १० जुलै रोजी गृह विभागाच्या सचिवांना पत्रही पाठविले आहे. मागील काही दिवसांपासून तपासाची गती वाढल्याने ठेवीदारांमध्ये समाधान आहे.
वरपगाव येथे शुभकल्याण मल्टीस्टेटची मुख्य शाखा आहे. या मल्टीस्टेटने बीड जिल्ह्यातील ४२० ठेवीदारांना जादा व्याजदराचे अमिष दाखवत फसवणूक केली. करोडो रुपयांची गुंतवणूक करुन ठेवी परत केल्या नाहीत. त्यामुळे शुभकल्याणच्या अध्यक्ष, संचालकांविरोधात जिल्ह्यातील बीडसह अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारुर येथील पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.
एवढे गुन्हे दाखल झाल्यानंतरही पोलीस अधिकाºयांनी याचा तपास संथ गतीने केला होता. परंतु मागील आठवड्यात जुन्या अधिका-यांची हकालपट्टी करुन पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. पाटील, उप निरीक्षक ए. एस. सिद्दीकी हे अधिकारी नियुक्त करण्यात आले. त्यांनी तात्काळ तपासाला गती देऊन दिली. हाच धागा पकडून गेवराईच्या उप विभागीय दंडाधिकाºयांनी जिल्हाधिका-यांना महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत प्रस्ताव पाठविला.
या पत्राचा आधार घेऊन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी गृह विभागाचे सचिव यांना १० जुलै रोजी पत्र पाठविले. यामध्ये प्रस्तावाच्या अधिनियमातील कलम ४ (३) अन्वये उप विभागीय दंडाधिकारी, गेवराई यांनी सादर केलेल्या अहवालासोबत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. पाटील यांनी दिलेल्या यादीतील संस्थापक / चेअरमन यांची मालमत्ता जप्त करावी असे पत्रात नमूद आहे. या पत्रामुळे ठेवीदारांमध्ये समाधान आहे. आपल्याला रक्कम मिळेल या आशेवर ठेवीदार असल्याचे समजते. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून आजही तपासाला गती दिली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. लवकरच आरोपींनाही बेड्या ठोकणार असल्याचे सूत्रांकडून समजते.आरोपींचा आर्थिक गुन्हे शाखेकडून शोध सुरुशुभकल्याण मल्टीस्टेटचे अध्यक्ष भारत अलझेंडे, उपाध्यक्ष संजय बाबुलाल शर्मा यांच्यासह ज्योती टाकणखार, शेख फरीदा सुलताना शेख मजहर, सुशीला अलझेंडे, शुभांगी लोखंडे, उद्धव जाधव, अर्जुन होके, शहाजी शिंदे, अनिता प्रधान, विनोदकुमार जाजू, धर्मराज भिसे, सुरेखा खडके या संचालक मंडळाचा आरोपींमध्ये समावेश आहे. या सर्व आरोपींची मालमत्ता जप्त होणार असून, त्यांच्या अटकेसाठी आर्थिक गुन्हे शाखा प्रयत्न करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यादृष्टीने माहितीही घेतली जात असल्याचे समजते.
ठेवीदारांना आशाशुभकल्याणच्या संचालक मंडळाची संपत्ती जप्त होणार असल्याची बातमी समजताच ठेवीदारांना आपले पैसे परत मिळतील अशी आशा आहे. मल्टीस्टेटच्या फसवणुकीचा तपास लावत तात्काळ पैसे परत करावेत, अशी मागणीही ठेवीदारांमधून होत आहे.