लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनाविरोधात सर्वात पुढे होऊन आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी हे कर्तव्य बजावत आहेत. सुरुवातीला कोरोना वॉर्डमध्ये थेट कर्तव्य बजावणाऱ्यांना ५ ते १४ दिवस क्वाॅरंटाईन ठेवले जात होते; परंतु आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांना नियमित कर्तव्यावर बोलावले जात आहे. इतरांवर उपचार करीत असलो तरी आमची सुरक्षितता धोक्यात आहे, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. तर काहींनी आम्ही पूर्ण काळजी घेऊन कर्तव्य बजावण्यासह घरी राहात असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, खाटा व मनुष्यबळ अपुरे पडत आहे. उपाययोजना करताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला आजही आरोग्य कर्मचारी, डॉक्टर हे जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देत असल्याचे दिसते. आता आपत्तीच उद्भवल्याने त्याविरोधात ते लढा देत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना
कोरोना ही एक आपत्ती आहे. सुरुवातीच्या काळात कर्तव्य बजावल्यानंतर होम क्वारंटाईन केले जात होते; परंतु आता रुग्णसंख्या वाढत आहे, त्यातच मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने त्यांना काळजी घेण्याचे आवाहन करून कर्तव्यावर बोलावले जाते. सर्व कर्मचाऱ्यांच्या कायम सोबत असू.
- डॉ.सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
मुलाबाळांची काळजी वाटतेय, पण...
पाच दिवस ड्यूटी आणि पाच दिवस ऑफ असायला पाहिजे, पण ऑफ तर नाहीच उलट कामाचा ताण वाढला आहे. रोटेशन बंद केले आहे. आठवड्यातून केवळ एकच दिवस ऑफ मिळतो. घरी आल्यानंतर मुला बाळांची काळजी असल्याने अंघोळ करूनच घरात प्रवेश करते.
- डॉ.शीतल चिंचखेडे-फालके
जिल्हा रुग्णालय बीड
सीटी स्कॅन विभागात मी कर्तव्य बजावतो. मशीनवर झोपविण्यापासून ते उठवण्यापर्यंत सर्व माहिती द्यावी लागते. अनेकदा त्यांना मदतही करावी लागते. त्यामुळे थेट बाधितांशी संपर्क येतो, असे असले तरी पीपीई किट आदी उपकरणे वापरून काळजी घेतो.
- अशोक नांदे, तंत्रज्ञ.
जिल्हा रुग्णालय बीड.
कोरोना वॉर्डमध्ये कर्तव्य बजावत नसले तरी सर्वेक्षण, लसीकरण, प्रतिबंधात्मक कारवाया यासाठी काम करत असते. घरी गेल्यावर सर्व काळजी घेऊनच मुलीला जवळ घेते. आमच्यापासून मुलांना अथवा कुटुंबातील इतर सदस्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतो. - रेखा बहिर-नांदे
एएनएम, प्रा.आ.केंद्र उमापूर
घरच्यांची धाकधूक वाढली
पत्नी कोरोनात कर्तव्य बजावून सामान्यांना जीवनदान देते, याचा अभिमान आहे. घरी आल्यावर ती पूर्ण काळजी घेऊनच आत प्रवेश करते. आमचा मुलगाही समजदार असल्याने तो आग्रह करत नाही.- ॲड. मधुकर फालके
मुलगा आला की तो अंघोळ करूनच घरात येतो. असे असले तरी घरात इतर वृद्ध सदस्य असल्याने भीती असते; परंतु आता नाइलाज आहे. मनात भीती ठेवून किती दिवस घरात बसणार, हा प्रश्न आहे.- सर्जेराव शिंदे