बीड : पालवन येथे सह्याद्री देवराईत झालेल्या पहिल्या वृक्ष संमेलनात शेतकरी कुटुंबातील क्रांती रामहरी बांगर हिने वृक्ष सुंदरीचा मुकूट पटकावला. गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या स्पर्धेनंतर समारोपाला सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी हा निकाल जाहीर केला. बी.एस्सी कृषी पदविका प्राप्त क्रांती बांगर ही बीडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी.
आयटीआयमधील सुवर्णा बागडे, नानासाहेब शिंदे व अन्य शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याने वृक्ष सुंदरी स्पर्धेत भाग घेतला. बीएस्सी. अॅग्री झाल्याने झाडांबद्दल माहिती होती. त्यामुळे भाग घेताना आत्मविश्वास होता. वडिल शासकीय सेवेत चालक आहेत. आई- वडिलांनी शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिल्याने फायदा झाल्याचे सांगून क्रांती म्हणाली, ‘या निवडीमुळे जबाबदारी वाढल्याचे ती म्हणाली. धारूर तालुक्यातील घागरवाडा हे माझं गाव. गावाला देवराई करण्याचा प्रयत्न राहील. रासेयोच्या माध्यमातून एक हजार वृक्ष लागवड आणि संगोपनाचे मी व सहकाऱ्यांचे ध्येय आहे.’
निमित्त वृक्ष सुंदरीचे, ज्ञान निसर्गाचे सह्याद्री देवराईत पार पडलेल्या पहिल्या वृक्ष संमेलनात वृक्ष सुंदरी ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. निमित्त वृक्ष सुंदरीचे असलेतरी वृक्ष चळवळीत तरूणींचा सहभाग वाढावा हाच यामागील उद्देश होता. स्पर्धेच्या रॅपिड फायर राऊन्डसाठी निवडलेल्या दहा तरूणींमध्ये निसर्गातील सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांवर स्पर्धा झाली. बीडजवळ राखीव जंगलक्षेत्र कोणते? आसपासच्या पाच झाडांची नावे सांगा, झाडांचे फायदे, झाडे का लावावीत, जगात दोन ठिंकाणी वणवा कुठे पेटला? झाडांवर उडणारा प्राणी कोणता? झाडे वाचविण्यासाठी झालेली आंदोलने, चिमण्यांना कोणती झाडे आवडतात? का? झाडाबंद्दल उस्फूर्त दहा वाक्यात माहिती. पारंब्या का होतात? कुठल्या झाडाबद्दल अंधश्रद्धा आहे? कोणत्या कालावधीत झाडांना जपले पाहिजे? काटेशेवरी झाड कसे आहे? भारतात सर्वात मोठे वडाचे जाड कोठे आहे? मी वृक्ष सुंदरी झाले तर? झाडांच्या ओव्या सांगा. सह्याद्री देवराई परिसरात झाडे कोणत्या पध्दतीने लावण्यात आली? अजाणवृक्ष कोणते? गौतम बुध्द यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या झाडाखाली झाली? अशा प्रश्नांच्या माध्यमातून स्पर्धक तरूणींचे ज्ञान परीक्षकांनी जाणून घेतले. जिथे स्पर्धक निरुत्तर होत तेथे पॅनलमधील तज्ज्ञ उत्तरे देऊन माहिती सांगत होते.