गेवराई : वांझ तुरीच्या बियाण्यांमुळे तुरीला शेंगा लागल्या नसल्याने आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी पत्राद्वारे दिली होती. त्यावर नेमलेल्या तालुकास्तरीय समितीने प्रत्येक शेताची पाहणी करून तूरपिकाला ९० टक्क्यांपेक्षा जास्त शेंगा लगडल्या नसल्याने यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे पाहणी अहवालात नमूद केले आहे. झाड डोक्याइतके वाढले; पण शेंगाच लगडल्या नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी विश्वंभर टकले यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील एका कृषी साहित्य दुकानातून महाबीज सीडस कंपनीच्या ‘बीडीएन ७११’ या तूर बियाण्यांच्या दोन पिशव्या खरेदी केल्या होत्या. १९ जून रोजी त्यांनी शेतामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली होती. तसेच या तुरीला विविध खते, औषधे फवारणी देण्यात आली. मात्र तब्बल सहा महिने लोटले तरी सध्या स्थितीत तूरपीक डोक्याएवढे वाढले, मात्र शेंगाच आल्या नाहीत. तसेच शेजाऱ्यांच्या तुरीचे खळे होऊन विक्री झाल्याने टकले यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे २८ डिसेंबर रोजी प्रथम बियाण्यांची रीतसर तक्रार केली. त्यानुसार १९ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी बी. टी. सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र खामगावचे हनुमान गरुड, पंचायत समितीचे पुरी, संदीप देशमुख, आर. आर. चव्हाण, महाबीज कंपनीचे धस, कृषी मंडळ अधिकारी दीपक राठोड यांच्या तालुकास्तरीय निविष्ठा तक्रार निवारण समितीने प्रत्यक्ष शेतात पाहणी केली. या समितीने दिलेल्या अहवालामध्ये पिकाच्या परिपक्वता कालावधीत संपूर्ण क्षेत्रांमध्ये फरक दिसून आल्याचे नमूद करीत एक एकर क्षेत्रात ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आढळून आल्याचे म्हटले आहे.