अशुद्ध पाणी पुरवठा
बीड : शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, पाइपलाइन फुटल्यामुळे ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याची शक्यता असून, अनेक भागांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी नळाला येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्याची दुर्दशा
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने लक्ष देण्याची मागणी होत आहे; परंतु दुर्लक्ष केले जात आहे.
नदीत झुडपे वाढल्याने पात्र अरुंद
चौसाळा : बीड तालुक्यातील कुंभारी, सात्रापोत्रा, पालसिंगण या गावांतून वाहणाऱ्या गणेश नदीपात्रात झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. तसेच वाळू उपशामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, ओढ्यासारखे दिसत आहे. यामुळे नदीपात्रातील झाडेझुडपे कमी करून स्वच्छतेची मागणी केली जात आहे; परंतु अद्यापही याकडे दुर्लक्षच केले जात आहे.
शेती सिंचन अडचणीत
अंबाजोगाई : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वेळी-अवेळी वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रबीचा हंगाम चांगला पार पडला. मोठ्या प्रमाणात गहू, ज्वारी, हरभरा यांचा पेरा झाला. ऊस लागवडही जोमाने सुरू आहे. आता पिकांना पाणी देण्याची वेळ आलेली आहे. वीज सुरळीत पुरविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रोहित्राचा धोका
बीड : तालुक्यातील चौसाळा येथील मोंढा परिसरात असलेले विद्युत रोहित्र उघडे असून, त्याचे फ्यूज तुटलेले आहे. तुटक्या फ्यूजआधारे वीज पुरवठा सुरू आहे. रोहित्र उघडे असल्याने या परिसरात अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही. नवे फ्यूज बसवण्याची मागणी आहे.
अतिक्रमणांकडे दुर्लक्ष
पाटोदा : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतींना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर हातगाड्यांची गर्दी असते. अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.