-- कृषी अधिकारी व्यापा-यांना घालत आहेत पाठीशी
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : कृषी अधिकाऱ्यांचे मौन
माजलगाव :
पुरुषोत्तम करवा
शेतात पेरण्यासाठी सोयाबीन व तुरीचे बियाणे शासकीय अनुदानात मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्याची सोडत काढण्यात आली. मात्र लॉटरी पध्दतीने मिळालेले बियाणे शेतकऱ्यांना परमिट मिळूनही देण्याबाबत व्यापाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. अशा व्यापाऱ्यांना कृषी अधिकारी पाठीशी घालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अनुदानित बियाणांसाठी माजलगाव तालुक्यातील ५९१ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर मागील महिन्यात नोंद केली होती. त्याची सोडत पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीमध्ये सोयाबीन बियाणांसाठी २०२, तर तूर बियाणांसाठी १६८ शेतकरी निवडले गेले.
माजलगाव तालुक्यासाठी सोयाबीनचे बियाणे १६८ क्विंटल मिळाले. सोयाबीन बियाणे एका एकरला ३० किलो देण्याचा नियम आहे, तर तुरीचे बियाणे माजलगाव तालुक्यासाठी ९.८० क्विंटल देण्यात आले होते. एका शेतकऱ्यास पाच एकर व एकरी ६ किलो बियाणे देण्याची मर्यादा घालून देण्यात आली होती.
महाडीबीटी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना येथील तालुका कृषी कार्यालयाकडून हे बियाणे घेण्यासाठी परमिटही देण्यात आले. कृषी कार्यालयाकडून शेतकऱ्यांना परमिट देऊन ४-५ दिवस झाले. परंतु यातील अनेक शेतकऱ्यांना ठरवून दिलेल्या व्यापाऱ्यांकडून अद्याप बियाणेच दिले गेले नसून व्यापाऱ्यांकडून बियाणे देण्यास चालढकल केली जात आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रार करूनही कृषी अधिकारी शेतकऱ्यांची दखल न घेता व्यापाऱ्यांची बाजू घेत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे.
----
१०० रुपये वाचविण्यासाठी १०० खर्च
अनुदानामध्ये बियाणे घेतल्यास शेतकऱ्यांचा थोडाफार फायदा होती, परंतु या ठिकाणी बियाणे घेण्यास आल्यानंतर व्यापाऱ्यांकडून वेळेत बियाणे दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा जावे लागत आहे. अनुदानाच्या बियाणांतून १०० रुपये वाचवायला गेलो, पण ये-जा करण्यात १०० रुपये खर्च आला असल्याचे शेतकरी सांगत होते.
------
मला कृषी कार्यालयाने तूर बियाणाचे परमिट देऊन चार पाच दिवस उलटले. मी सांगितलेल्या दुकानदाराकडे अनेक वेळा गेलो असता, त्यांनी बियाणे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना अनेक वेळा बोललो असता, त्यांनी वारंवार व्यापाऱ्यांचीच बाजू मांडली. याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार देणार आहे.
- विलास साळवे, शेतकरी
------
लॉटरी पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना बियाणे मिळाले आहे, त्या शेतकऱ्यांनी ठरवून दिलेल्या दुकानांमधून बियाणे खरेदी करायचे आहे. एखाद्या दुकानात एपीएल संपले असले तरी शेतकऱ्यांनी दुसऱ्या दुकानातून बियाणे घ्यावे.
- शिवप्रसाद संगेकर, तालुका कृषी अधिकारी, माजलगाव