बीड: संत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव (ता.पाटोदा) येथील भगवान भक्तीगडाच्या मंदिरातून दोन दानपेट्या लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांचा पोलिसांनी २४ तासांच्या आत पर्दाफाश केला. गुन्हे शाखा व अंमळनेर पोलिसांनी ९ जानेवारी रोजी रात्री त्यांना ताब्यात घेतले.
अविनाश दिनकर पायाळ (२५,रा.थेरला ता. पाटोदा), अभय सताप्पा कांबळे (२०,रा. वडझरी ता.पाटोदा) व करण उर्फ आवड्या कल्याण गायकवाड (१९,रा.रोहतवाडी ता.पाटोदा) अशी आरोपींची नावे आहेत. ८ जानेवारी रोजी रात्री रात्री ११ वाजेनंतर चोरट्यांनी भगवान भक्तगड येथील मंदिरासमोरील दानपेटी तसेच श्री. संत वामनभाऊ मंदिरासमोरील दानपेटी चोरीस गेली होती. ९ रोजी सकाळी विनायक विठ्ठलराव सानप हे भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले तेव्हा त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर विनायक सानप यांच्या तक्रारीवरुन अंमळनेर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने बीड बसस्थानकासमोरुन अविनाश पायाळच्या मुसक्या आवळल्या तर अंमनळेर पोलिसांनी अभय कांबळे व करण गायकवाड यांना थेरला फाट्यावरुन उचलले. कसून चौकशी केल्यावर त्यांनी दानपेटी पळविल्याची कबुली दिली.
दानपेट्यांतील रक्कम काढून त्या विहिरीत फेकल्या होत्या. दानपेट्यांसह ३० हजार रुपये हस्तगत केले आहेत. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, सहायक उपनिरीक्षक संजय जायभाये, हवालदार नसीर शेख, पो.ना.गणेश हंगे, मच्छींद्र बीडकर व अंमळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक गोरख पालवे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, चोरीसाठी त्यांनी आलिशान जीप वापरली. ती जप्त केली असून १० रोजी दुपारी त्यांना न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.
भाविकांत होती संतापाची लाटदरम्यान, या घटनेने भाविकांत संतापाची लाट निर्माण झाली होती. पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, गुन्हे शाखा निरीक्षक सतीश वाघ यांनी गुन्हे शाखा व अंमळनेर ठाण्याचे पथक तपासकामी रवाना केले. २४ तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात यश आले.